Monday, November 16, 2026
spot_img
Home राजापूर बारसूतील रिक्षाचालक तरुणाचे अपहरण

बारसूतील रिक्षाचालक तरुणाचे अपहरण

पाचल:- रिक्षाचे भाडे घेऊन घराबाहेर पडलेला २७ वर्षीय तरुण बेपत्ता झाल्याने राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात खळबळ उडाली आहे. या तरुणाचे अज्ञात व्यक्तीने गुप्तपणे व गैरपणे डांबून ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त करत त्याच्या मामाने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेची फिर्याद बारसू खालचीवाडी (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) येथील शेतकरी प्रभाकर सखाराम कदम (वय ६३) यांनी दिली आहे. अपहरित तरुण शुभम रवींद्र शिर्के (वय २७, रा. बारसू खालचीवाडी, ता. राजापूर) हा फिर्यादी प्रभाकर कदम यांचा भाचा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास शुभम हा बारसू खालचीवाडी येथील आपल्या राहत्या घरातून रिक्षाचे भाडे घेऊन गेला होता. मात्र, त्यानंतर तो घरी परतलाच नाही. कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता, तो अद्यापपर्यंत कोठेही मिळून आलेला नाही. अखेर कोणीतरी अज्ञात इसमाने शुभम याला गुप्तपणे व गैरपणे परिरुद्ध करण्याच्या उद्देशाने त्याचे अपहरण केल्याची तक्रार मामा प्रभाकर कदम यांनी १५ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी राजापूर पोलीस ठाण्यात नोंदवली.

या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०२/२०२६ नुसार नोंद केली असून, बेपत्ता रिक्षाचालक शुभम शिर्के आणि अज्ञात अपहरणकर्त्याचा शोध घेण्यासाठी राजापूर पोलिसांनी तपास चक्रे गतिमान केली आहेत.