Monday, November 16, 2026
spot_img
Home संगमेश्वर नायरी मोहल्ल्यात भीषण आग; कौलारू घर जळून खाक

नायरी मोहल्ल्यात भीषण आग; कौलारू घर जळून खाक

सुदैवाने घरात कोणी नसल्याने मोठी जीवितहानी टळली

संगमेश्वर:- तालुक्यातील नायरी मोहल्ला येथे मध्यरात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत नियाज पाटणकर आणि जाकीर पाटणकर यांचे कौलारू घर पूर्णपणे जळून खाक झाले. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. घरातील साहित्यांसह संपूर्ण वास्तू बेचिराख झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, नायरी मोहल्ला येथील पाटणकर यांचे कौलारू घर बंद होते. मध्यरात्री अचानक या घराला आग लागली. आगीची माहिती मिळताच देवरुख येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आगीने संपूर्ण घराला वेढा घातला होता. त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य आणि घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घरामध्ये कोणीही वास्तव्यास नसल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच फणसवणे मंडल अधिकारी कदम, तलाठी तसेच महसूल विभागातील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळी धाव घेतली. सदरची आग देवरुख नपच्या अग्निशमन कर्मचाऱ्यांनी पहाटे उशीरपर्यंत जागून विझवली.

आगीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली असून प्रत्यक्ष पंचनाम्यानंतर नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट होणार आहे. मध्यरात्रीच्या या आगीत पाटणकर कुटुंबाचे कौलारू घर आणि संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. एका क्षणात उभ्या संसाराची राखरांगोळी झाली; मात्र घरात कोणी नसल्याने सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही.