Sunday, November 15, 2026
spot_img
Home संगमेश्वर डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू

देवरुख येथील घटना

देवरुख:- दुचाकी सर्व्हिसिंगसाठी देवरुख येथे जात असताना वाटेतच फिट आल्याने रस्त्याच्या कडेला कोसळून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या २८ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. केतन संजय मोहिते (वय २८, रा. तुळसणी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे या मृत तरुणाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केतन मोहिते हा गेल्या तीन वर्षांपासून फिटच्या आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर नियमित औषधोपचार सुरू होते. सोमवार दि. ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास केतन आपली मोटारसायकल सर्व्हिसिंग करण्यासाठी देवरुखच्या दिशेने निघाला होता. देवरुख ते तुळसणी मार्गावरील मौजे आंबव येथे आला असता त्याला अचानक फिट आली. यामुळे तो दुचाकीवरून रस्त्याच्या कडेला कोसळला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

​या मार्गावरून जाणारे साक्षीदार बाळकृष्ण कांबळे यांना केतन रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेला दिसून आला. त्यांनी तत्काळ धाव घेत त्याला उपचारासाठी देवरुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला अधिक उपचारांसाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.

​मात्र, रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सोमवारी रात्री ९ वाजून २१ मिनिटांच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शुक्रवारी दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांनी आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ४८/२०२६ नुसार भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.