चिपळूण:- तालुक्यातील आबिटगाव बौद्धवाडी येथील एका ५० वर्षीय व्यक्तीचा किटकनाशक प्राशन केल्यामुळे विषबाधा होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.५३ वाजताच्या सुमारास डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात घडली. प्रभाकर गणपत पवार (वय ५०, रा. आबिटगाव बौद्धवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मयत प्रभाकर पवार यांना दारूचे व्यसन होते. गुरुवार, ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास ते दारू पिऊन घरी आले असता त्यांना अचानक उलट्या सुरू झाल्या. उलट्यांमधून उग्र वास येत असल्याचे त्यांची पत्नी (खबर देणाऱ्या प्रियांका राजेश जाधव यांची आई) यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पवार यांना तातडीने उपचारासाठी डेरवण येथील श्री वालावलकर रुग्णालयात दाखल केले.
मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच ७ नोव्हेंबर रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. पवार यांनी कीटकनाशक औषध प्राशन केल्यामुळे विषबाधा होऊन त्यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले.
या प्रकरणी मयताची मुलगी प्रियांका राजेश जाधव यांनी दिलेल्या माहितीवरून चिपळूण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.









