Sunday, November 8, 2026
spot_img
Home रत्नागिरी बॅंकेने सील केलेले घर तोडून अनधिकृत ताबा; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

बॅंकेने सील केलेले घर तोडून अनधिकृत ताबा; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- श्रीराम फायनान्स कंपनीचे कर्ज न फेडल्यामुळे न्यायालयाने जप्त करून सील ठोकलेल्या घरातील टाळे व सील तोडून अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी देवरुख येथील पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून, याप्रकरणी ६ नोव्हेंबर रोजी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर रघुनाथ फटकरे आणि सौ. माया सागर फटकरे (दोघे रा. १२५, दत्तप्रसाद फाटक मंगल कार्यालयाजवळ, मधली आळी, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी श्रीराम फायनान्स लि. शाखा रत्नागिरी यांच्याकडून पन्नास लाख रुपयेचे कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी देवरुख येथील नगरपंचायत घर क्र. २/१२५ए (सर्व्हे नं. १६३, हिस्सा क्र. ०२ अ, ३ए/७, क्षेत्र ५६४.०० चौ.मी., बांधकाम क्षेत्र १३८.५० चौ.मी.) ही मिळकत तारण म्हणून गहाण ठेवली होती.
‘सरफेसी’ कायद्यानुसार झाली होती जप्ती
आरोपींनी कर्जाची नियमित परतफेड न केल्यामुळे श्रीराम फायनान्स कंपनीने कायदेशीर मार्ग अवलंबला. मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी यांच्या ०७ मार्च २०२६ रोजीच्या आदेशानुसार, ‘सरफेसी कायदा २००२’ च्या कलम २९ अन्वये सदर मिळकतीचा रीतसर ताबा श्रीराम फायनान्स कंपनीला देण्यात आला होता. कंपनीने पंचनामा करून घराच्या दरवाजाला व कडीला अधिकृत सील ठोकले होते.
२६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास आरोपी पती-पत्नीने न्यायालयाने रीतसर जारी केलेल्या आदेशाचा थेट भंग केला. त्यांनी घराच्या दरवाजाला लावलेले सील तोडून कंपनीच्या ताब्यातील मिळकतीत गैरहेतूने व अनाधिकाराने प्रवेश केला आणि बेकायदेशीररीत्या घरात राहण्यास सुरुवात केली.
याप्रकरणी श्रीराम फायनान्स लि. रत्नागिरी शाखेचे मुख्त्यारपत्र धारक सागर गणपत कांबळे (वय ४०, रा. फणसोप भीमनगर, सध्या रा. माळनाका, रत्नागिरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरुख पोलिसांनी आरोपी सागर फाटकरे व माया फाटकरे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२९(४), ३२४, ३(५) आणि भा.दं.वि. कलम ४४८, ४२७, ३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.