पर्यटनाला सुरक्षेची जोड देण्याचे मोठे आव्हान
रत्नागिरी:- जिल्ह्याला लाभलेला विस्तीर्ण समुद्रकिनारा, वेधून घेणाऱ्या खाड्या, खळाळणाऱ्या नद्या, धबधबे आणि निसर्गरम्य तलाव हे रत्नागिरीच्या सौंदर्यात भर घालतात. मात्र निसर्गाचे हेच नयनरम्य रूप अनेकदा स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी काळाचा घाला घालणारे ठरत आहे. गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यात पाण्यात पडून अथवा बुडून तब्बल ५८१ जणांना आपला अमूल्य जीव गमवावा लागला आहे. सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना रोखण्याचे आणि पर्यटनाला सुरक्षेची जोड देण्याचे मोठे आव्हान आता स्थानिक प्रशासन व नागरिकांसमोर उभे ठाकले आहे.
नियमांचे उल्लंघन आणि प्रशासनाचे आवाहन
जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळांवर आणि धोकादायक पाणवठ्यांवर प्रशासनाकडून धोका दर्शवणारे सूचना फलक लावले जातात. तसेच काही ठिकाणी जीवरक्षकही तैनात केले जातात. मात्र तरीही अनेकदा उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन केले जाते. त्यामुळे नागरिकांनी आणि पर्यटकांनी अनोळखी पाणवठ्यांवर उतरताना योग्य ती काळजी घेणे, तसेच पाण्याचा अंदाज न घेता पाण्यात उतरणे पूर्णपणे टाळणे अत्यंत गरजेचे बनले असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
२०२४ साली बुडालेल्यांची संख्या जास्त
जिल्ह्यात २०२१ या वर्षात १०० जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तर २०२२ मध्ये ही संख्या वाढून १०१ वर पोहोचली. २०२३ मध्ये ९६ जणांचा जीव गेला. यानंतर २०२४ मध्ये या घटनांमध्ये प्रचंड वाढ होऊन तब्बल ११२ जणांचा बळी गेला. २०२५ मध्ये ९८ मृत्यूंची नोंद झाली. चालू २०२६ या वर्षात केवळ जुलै महिन्याअखेरपर्यंतच तब्बल ७४ जणांना आपला प्राण गमवावा लागला असल्याची नोंद प्रशासनाकडे झाली आहे.
निष्काळजीपणा, अनपेक्षित धोके प्राणघातक
साडेपाच वर्षांतील एकूण ५८१ मृत्यूंमागील कारणांचा शोध घेतला असता यामध्ये निष्काळजीपणा आणि पाण्याचा अंदाज न येणे हेच मुख्य कारण समोर आले आहे. समुद्राच्या लाटांचा व खोलीचा अंदाज न आल्याने वाहून गेलेले पर्यटक, नद्या व खाडीपात्रात मासेमारी किंवा स्नानासाठी उतरलेले स्थानिक, तसेच पावसाळ्यात पुराच्या पाण्यात अथवा शेतात साचलेल्या पाण्यात पडून घडलेल्या अपघातांचा यात समावेश आहे, अचानक उद्भवणाऱ्या या धोक्यांमुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.









