वादळाचे संकट टळले; सह्याद्रीने वाचवला कोकण 

रत्नागिरी:- बंगालच्या उपसागरातून बाष्पाचा प्रचंड साठा सोबत घेऊन महाविनाश घडवित, अरबी समुद्राकडे वेगाने झेपावत निघालेले चक्रीवादळ महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या दणकट डोंगररांगांनी अडविले. तेथेच त्याचे रूद्र रौप मावळले.

वाटेत डोंगररांगा आडव्या आल्याने त्याचा वेग मंदावला. पुढचा मार्गही खुंटला. त्यामुळे ते सातारा व वडुज परिसरातच 12 ते 15 तास रेंगाळले. आता थंडावलेले हे वादळ सह्याद्रीच्या डोंगररांगा पार करीत, पहाटे अरबी समुद्रात प्रवेश करील. या अस्मानी संकटापासून नगर जिल्हा थोडक्‍यात बचावला. गेल्या दोन दिवसांत हवामान खात्याच्या संकेतस्थळावर हे नाट्य पाहायला मिळाले. 

विशाखापट्टणमपासून निघालेले हे भयंकर चक्रीवादळ महाविनाश घडवित हैदराबाद, कर्नाटक व सोलापूरमार्गे महाराष्ट्रात घुसले. मार्ग बदलल्याने नगर जिल्ह्यातील त्याचे आगमन थोडक्‍यात हुकले. त्याने मार्ग बदलला नसता, तर नगर, शिरूर ते मुंबईपर्यंतच्या वादळाच्या प्रवासात मोठा उत्पात घडला असता.

सुदैवाने ते थोडे दक्षिणेकडे सरकले. कोयना परिसरातील सह्याद्रीच्या डोंगररांगावर आदळले. त्यातून काल (बुधवारी) मध्यरात्री एका अर्थाने त्याची अखेर झाली. त्याची विनाशकारी शक्ती सह्याद्रीने नष्ट केली. सह्याद्रीच्या कृपेने नगर, शिरूर व मुंबईचे मोठे नुकसान टळले. मात्र, सातारा व वडुज परिसरात 15 तास रेंगाळल्याने तेथे जोराचा पाऊस व मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली.