Thursday, October 22, 2026
spot_img
Home रत्नागिरी मिरकरवाडा जेटीवरील परप्रांतीय नौकांविरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक

मिरकरवाडा जेटीवरील परप्रांतीय नौकांविरोधात स्थानिक मच्छीमार आक्रमक

रत्नागिरी:- मिरकरवाडा बंदरातील जेटीवर किरकोळ दुरुस्तीसाठी येणाऱ्या परप्रांतीय मासेमारी नौका दिवसभर जेटी अडवून ठेवत आहेत. मासेमारी करुन परतलेल्या स्थानिक मच्छिमार नौकांना मासळी उतरवण्यासाठी जेटी मिळत नाही. त्‍यामुळे स्थानिक मच्छिमार संतप्त झाले असून बंदरावरील वातावरण तंग झाले आहे. स्थानिक मच्छिमार नेत्‍यांनी यासंदर्भात सहाययक मत्‍स्यव्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत यांच्यासह बंदर विभागाकडे तक्रार केली आहे. सहाययक मत्‍स्यव्यवसाय आयुक्तांनी दुरुस्तीसाठी जेटीवर आलेल्या परप्रांतीय नौकांची दुरुस्ती झाल्यानंतर तातडीने नौका जेटीवरुन हलवण्याची कार्यवाही करण्याच्या सुचना सुरक्षा रक्षकांना केल्या आहेत.
रत्‍नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील जेटीवर गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय अद्यावत आणि मोठया मासेमारी नौका दुरुस्तीच्या नावाखाली येत आहेत. दुरुस्तीसाठी येणाऱ्या एका नौकेबरोबर इतर ३ ते ४ नौकाही सोबत येतात आणि जेटीवर उभ्या करतात. या अवाढव्य परप्रांतीय नौकांमुळे मासेमारी करुन परतलेल्या नौकांना जेटीवर येण्यासाठी मार्गच मिळत नाही. मिरकरवाडा बंदरावरील जेटींवर सुमारे ३०० नौका उभ्या करण्याची क्षमता असून प्रत्‍यक्षात ४५० ते ५०० नौकांची येजा सुरु असते. त्‍यात आता परप्रांतीय नौका किरकोळ दुरुस्तीसाठी येवून दिवस-दिवसभर जेटी अडवून ठेवू लागले आहेत.
परप्रांतीय नौका गेल्या अनेक दिवसांपासून जेटी अडवून ठेवू लागल्याने मच्छिमार नेते नुरुद्‌दीन पटेल, बिलाल सोलकर यांनी सोमवारी सहाययक मत्‍स्यव्यवसाय आयुक्त जे.डी.सावंत यांची भेट घेवून तक्रार केली. या परप्रांतीय नौकांना मिऱ्या बंदर, भगवती बंदर येथे जाण्यास सांगावे अशी विनंती मच्छिमार नेत्‍यांनी केली. नियमानूसार आश्रयासाठी किंवा दुरुस्तीसाठी येणाऱ्या राज्याबाहेरील नौकांना जेटी नाकारता येत नाही असे सहाययक आयुक्तांनी सांगितले. त्‍याचवेळी सुरक्षारक्षकांना या नौकांची दुरुस्ती झाल्यानंतर तातडीने जेटी मोकळी करुन देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सुचनाही सहाययक आयुक्तांनी केल्या.
सुरक्षा रक्षकांकडून माहीती घेतली तेव्हा काही स्थानिक मच्छिमारच परप्रांतीय नौका आपली असल्याचे सांगून मदत करत असल्याची माहीती सहाययक आयुक्तांना मिळाली. यासंदर्भात सहाययक आयुक्त जे.डी.सावंत यांनी बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची भ्रमणध्वनीवरुन माहीती दिली. जेटीवर दिवस-दिवसभर उभ्या राहणाऱ्या परप्रांतीय नौकांमुळे होणाऱ्या स्थानिक नौकांच्या गैरसोईमुळे येथील मच्छिमार संतप्त असून वातावरण तंग असल्याचेही सहाययक आयुक्तांना कळवल्यानंतर दक्षता घेतली आहे.