Sunday, October 18, 2026
spot_img
Home चिपळूण टेरव येथे महावितरणकडून ५९ हजारांचा दंड, वायरमनला नोटीस

टेरव येथे महावितरणकडून ५९ हजारांचा दंड, वायरमनला नोटीस

मोबाईल टॉवरसाठी खांबावरून वीजचोरी करणाऱ्यावर कारवाई

चिपळूण:- तालुक्यातील टेरव येथे ग्रामसभेचा तीव्र विरोध डावलून सुरू असलेल्या मोबाईल टॉवरच्या कामासाठी थेट महावितरणच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चिपळूण महावितरणने तत्परतेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारत संबंधित जागामालकाकडून सुमारे ५९ हजार रुपयांचा दंड गुरुवारी वसूल केला आहे. तसेच या वीजचोरी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले टेरव येथील वायरमन श्री. मालप यांना महावितरणने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

टेरव येथील संतोष विश्राम म्हालीम यांच्या मालकीच्या जागेत एका मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, या कामाला स्थानिक ग्रामसभेने आधीच विरोध दर्शवला होता. ग्रामस्थांचा विरोध असतानाही हे काम सुरू ठेवण्यात आले आणि त्यासाठी महावितरणच्या विद्युत खांबावरून कोणतीही परवानगी न घेता थेट बेकायदेशीर वीजजोडणी करून विजेचा वापर केला जात होता. या गैरप्रकाराची माहिती मिळताच महावितरणच्या भरारी पथकाने दोन दिवसांपूर्वी संबंधित ठिकाणी अचानक धाड टाकली. या कारवाईदरम्यान विनापरवाना वीज वापरल्याचे प्रत्यक्ष निदर्शनास येताच पथकाने वीजचोरी उघडकीस आणली.

या बेकायदेशीर कृत्याबद्दल महावितरणने जागामालकावर कारवाई करत ५९ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानुसार ही संपूर्ण रक्कम जागामालकाने गुरुवारी महावितरण कार्यालयात तातडीने जमा केली. दुसरीकडे, या अनधिकृत वीजजोडणी प्रकरणात स्थानिक वायरमन श्री. मालप यांच्या भूमिकेबाबत ग्रामस्थांनी थेट महावितरण प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत अधिकाऱ्यांनी मालप यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून चौकशीत दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. ग्रामसभेचा विरोध आणि त्यातच उघडकीस आलेले हे वीजचोरीचे प्रकरण यामुळे सध्या टेरव परिसरात हा विषय प्रचंड चर्चेचा ठरला आहे.