तिघांचे मृतदेह हाती, एका मुलीचा शोध सुरू
राजापूर:- तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नाणार इंगळवाडी येथे रविवारी दुपारच्या सुमारास काळीज पिळवटून टाकणारी अत्यंत हृदयद्रावक घटना घडली. खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी आई-वडिलांसमवेत गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच भावंडांपैकी चार मुलांचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेत एका मुलीला सुदैवाने वाचवण्यात यश आले असले, तरी तिघांचा पाण्यात बुडून जागीच मृत्यू झाला असून एका मुलीचा शोध अद्याप सुरू आहे. या भीषण घटनेने संपूर्ण राजापूर तालुक्यासह नाणार पंचक्रोशीत तीव्र शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंगळवाडी येथील जुनेद भाटकर व त्यांच्या पत्नी हिना भाटकर हे आपल्या मुलांसह रविवार, ११ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कालवे आणि मुळे काढण्यासाठी गावातील खाडीपात्रात गेले होते. आई-वडील कालवे काढण्याच्या कामात मग्न असताना, दुपारी साडेचारच्या सुमारास पाण्यातील खोल खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे पाचही मुले अचानक पाण्याच्या प्रवाहाकडे ओढली गेली. पाण्याचा अंदाज न आल्याने मुलांनी आरडाओरडा सुरू केला. कुटुंबियांनी तातडीने धाव घेऊन त्यांना वाचवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. यामध्ये एका लहान मुलीला वेळीच बाहेर काढल्याने तिचा जीव वाचला, मात्र उर्वरित चार भावंडे खोल पाण्याच्या डोहात बुडाली.
या दुर्घटनेत मोहम्मद जुनेद भाटकर (वय ६ वर्षे), जुहेरिया जुनेद भाटकर (वय ९ वर्षे), बुशिरा जुनेद भाटकर (वय ११ वर्षे) आणि माहिरा जुनेद भाटकर (वय १५ वर्षे) या चार निष्पाप भावंडांवर काळाने झडप घातली. घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच नाटे सागरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थ आणि मच्छीमारांच्या मदतीने खोल पाण्यात युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. या शोधकार्यादरम्यान मोहम्मद, जुहेरिया आणि बुशिरा या तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून, पंधरा वर्षीय माहिरा हिचा शोध सायंकाळपर्यंत युद्धपातळीवर सुरू होता. भरल्या संसारातील चार निष्पाप मुलांचा एकाच वेळी असा करुण अंत झाल्यामुळे भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, घटनास्थळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.









