जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद
रत्नागिरी:- मोसमी पावसाला परतीचे वेध लागले असून यंदा गतवर्षीपेक्षा जिल्ह्यात सरासरी पावसाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. गतवर्षी 12 ऑक्टोबरपर्यंत सरासरी 4,301 मिमी नोंद झाली होती तर यंदा 1 जुनपासून आतापर्यंत सरासरी 2,685 मिलीमीटर पाऊस पडला. सुमारे 1,616 मिमी पाऊस कमी झाला आहे.
गेल्या साडेचार महिन्यात यंदा संगमेश्वर तालुक्यात 3320 मिमी सर्वाधिक पाऊस झाला. मात्र तुलनेत 1200 मिमी कमी नोंद झाली होती. या तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद दरवर्षी होत असते. त्यापाठोपाठ रत्नागिरी तालुक्यात 3183 पाऊस झाला. येथेही 1400 मिमीची तूट आहे. सर्वात कमी पाऊस दापोली तालुक्यात नोंदला गेला आहे. तेथे गतवर्षी 3812 मिमी पावसाची नोंद झालेली होती. गतवर्षी सर्वाधिक नोंद असलेल्या मंडणगड तालुक्यात यंदा 2309मिमी पाऊस झाला असून तुलनेत 1700 मिमी कमी पाऊस झाला. सर्वच तालुक्यात बाराशे ते दोन हजार मिमी कमी पावसाची नोंद झाल्याने त्याचा परिणाम पाणी टंचाईवर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाच्या अंदाजानूसार 15 ऑक्टोबरपर्यंत मोसमी पाऊस परतेल. सध्या जोरदार पाऊस पडत असला तरीही सरासरी भरुन काढण्याएवढी नोंद झालेली नसल्याने भविष्यात चिंताजनक स्थिती निर्माण होऊ शकते.
मोसमी पावसावर भात, नागली पिके अवलंबून असतात. यंदा जुनच्या सुरवातीला निसर्ग वादळाने तडाखा दिला. मोसमी पाऊस 9 जुनला कोकणात आला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात भात पेरण्या सुरु झाल्या. पेरणी, लावणीही व्यवस्थित पार पडली. जिल्ह्यात 67 हजार हेक्टरवर भात तर 9 हजार हेक्टरवर नाचणी लागवड झाली. समाधानकारक स्थितीमुळे खरीप हंगाम चांगला होईल असा अंदाज आहे. ऑगस्टअखेरीस ढगाळ वातावरणाने किडीचा प्रादुर्भाव झाला. सप्टेंबरमध्ये सुरवातीला ढगाळ वातावरणाने लष्करी अळी, पिस यासारख्या रोग पडले.