Saturday, September 26, 2026
spot_img
Home संगमेश्वर मोबाईलवरुन पालकांनी रागवल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

मोबाईलवरुन पालकांनी रागवल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

संगमेश्वर:- मोबाईल शाळेत घेऊन गेल्याच्या कारणावरून पालक रागावल्याने संगमेश्वर तालुक्यातील काटवली पड्याळवाडी येथील अवघ्या १३ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तिने विषारी पावडर प्राशन केल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे काटवली परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी या विद्यार्थिनीने आजीचा मोबाईल फोन कुणालाही न सांगता शाळेत नेला होता. सायंकाळी घरी परतल्यानंतर ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आली. त्यावरून पालकांनी तिला रागावून समज दिली. त्यानंतर रात्रीच्या सुमारास तिने घरात असलेल्या विषारी पदार्थाचे सेवन केल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. तिची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच कुटुंबीयांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच देवरुख पोलिसांनी नोंद घेतली असून, आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास देवरुख पोलिसांकडून करण्यात येत आहे.

किरकोळ कारणावरून पालकांनी दिलेली समज, राग किंवा तणाव मुलांच्या मनावर किती खोल परिणाम करू शकतो, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. किशोरवयीन मुलांच्या वर्तनातील बदल, त्यांची भावनिक अवस्था आणि त्यांच्या मनातील प्रश्न समजून घेण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. मुलांकडून चूक झाली तर शिक्षा किंवा कठोर शब्दांपेक्षा त्यामागचे कारण समजून घेणे, शांतपणे संवाद साधणे आणि भावनिक आधार देणे अधिक गरजेचे आहे. एका क्षणाचा राग किंवा गैरसमज आयुष्यभराची पोकळी निर्माण करू शकतो, याची जाणीव या घटनेने पुन्हा एकदा करून दिली आहे.