Thursday, September 24, 2026
spot_img
Home रत्नागिरी अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा

अवैध मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाईचा बडगा

रत्नागिरीत मत्स्य विभागाची धडक कारवाई

रत्नागिरी:- जिल्ह्यातील समुद्र आणि किनारी भागात सुरू असलेल्या अवैध मासेमारीविरोधात मत्स्य विभागाने मोठी कारवाई केली आहे. गस्तीदरम्यान नियमांचे उल्लंघन करून मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर मत्स्य विभागाने कारवाई केली असून, यामध्ये दोन स्क्विड जिगिंग नौका आणि एलईडी दिव्यांचा वापर करणाऱ्या एका नौकेचा समावेश आहे.
मत्स्य विभागामार्फत रत्नागिरी किनारपट्टीवर नियमित गस्त आणि तपासणी मोहीम राबवली जात आहे.

यादरम्यान, २२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या गस्तीवेळी दोन स्क्विड जिगिंग नौकांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ‘सानिया हफ्सा’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3851, मालक: सिकंदर जैनुद्दीन फणसोपकर) आणि ‘एच. सिमाक’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-601, मालक: सुलताना अख्तर होडेकर) या दोन नौकांचा समावेश आहे.
तसेच, दुसऱ्या एका कारवाईत २३ सप्टेंबर २०२६ रोजी करला जेट्टी येथे तपासणी करताना ‘गुरुप्रसाद’ (नोंदणी क्र. IND-MH-04-MM-3766, मालक: सुगंधा सुरेश ताकले) ही नौका एलईडी दिव्यांनी सुसज्ज असल्याचे निदर्शनास आले. या नौकेवरही मत्स्य विभागामार्फत नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

अवैध मासेमारीच्या प्रकारांना संपूर्ण आळा घालण्यासाठी यापुढेही समुद्रात तसेच जेट्टी व बंदर परिसरात गस्त आणि तपासणी मोहीम अधिक कडक करण्यात येणार आहे. सर्व मच्छىमार व नौका मालकांनी मत्स्य व्यवसायातील नियमांचे काटेकोर पालन करूनच मासेमारी करावी, असे आवाहन मत्स्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.