रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पांडव नगर येथे राहणाऱ्या ८० वर्षीय वृद्धाचा बाथरूममध्ये पाय घसरून पडल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. वसंत धर्माजी झगडे (वय ८०, रा. घर नं. १७९१, वसंत वर्षा, पांडव नगर, नाचणे, ता. जि. रत्नागिरी) असे मयत वृद्धाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, वसंत झगडे हे राहत्या घरी बाथरूमला जात असताना पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला होता. उपचारासाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी दुपारी १६:०० वाजता प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आणि केअर टेकर सुरभी गायकवाड यांच्यासह त्यांना अँब्युलन्सने घरी सोडण्यात आले.
मात्र, रात्रीच्या सुमारास रात्री पावणेआठच्या दरम्यान (१९:४५ वाजता) रात्रीच्या ड्युटीवरील केअर टेकर समेश गोविंद खेडेकर यांनी फोन करून वसंत झगडे हे काहीही बोलत नसून बेशुद्ध असल्याचे कळवले. यानंतर त्यांना तातडीने पुन्हा अँब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मात्र, तिथे तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २१ सप्टेंबर रोजी रात्री २२:०९ वाजता त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.









