Wednesday, September 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी पांगरी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

पांगरी अपघातातील जखमी तरुणाचा मृत्यू

सहा महिन्यांच्या उपचारांनंतर अंत, हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा

रत्नागिरी:- देवरुख येथे विवाह सोहळा आटोपून घरी परतताना पांगरी येथील धोकादायक वळणावर झालेल्या भीषण अपघाताने हातखंबा बौद्धवाडीवर कोसळलेले दुःख अखेर आणखी गडद झाले आहे. या दुर्घटनेत यापूर्वीच दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी झालेल्या विकास चंद्रकांत कांबळे याची गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर १२ सप्टेंबर रोजी संपली. मुंबईतील कांदिवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. या दुर्घटनेतील तिन्ही तरुणांचा मृत्यू झाल्याने हातखंबा परिसरावर शोककळा पसरली आहे.

हातखंबा येथील तरुण देवरुख येथे विवाह सोहळ्यासाठी गेले होते. २६ एप्रिल रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दुचाकीवरून देवरुखहून परतत असताना पांगरी येथील धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत सुमित विलास कांबळे आणि विकास काशीराम कांबळे या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता. तर विकास चंद्रकांत कांबळे हा गंभीर जखमी झाला होता.

गंभीर जखमी झालेल्या विकासला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्या कुटुंबीयांनी दुसऱ्याच दिवशी त्याला रत्नागिरी शहरातील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे अनेक दिवस उपचार सुरू होते. प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याच्यावर एकापाठोपाठ दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मात्र अपघातानंतर तो कोमात होता. उपचारांनंतरही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईला हलविण्यात आले. ठाण्यानंतर कांदिवली येथील खासगी रुग्णालयात गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर सहा महिन्यांची ही झुंज संपली.

विकास हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. अपघातानंतर त्याला वाचविण्यासाठी कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराने अक्षरशः शर्थीचे प्रयत्न केले. सहा महिन्यांपासून प्रत्येक दिवस आशेवर काढणाऱ्या कुटुंबीयांना १२ सप्टेंबर रोजी सकाळी आलेल्या विकासच्या निधनाच्या वार्तेने मोठा धक्का बसला. मुंबई येथील त्याच्या निवासस्थानी १२ सप्टेंबर रोजी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मित्रपरिवार आणि आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.