रत्नागिरी:- भारतीय हवामान विभागाने कोकण किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवार, १३ सप्टेंबरपासून कोकणातील हवामानात तीव्र बदल पाहायला मिळणार आहेत. रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
रविवार, १३ सप्टेंबर आणि सोमवार, १४ सप्टेंबर रोजी रत्नागिरी जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (ताशी ३०-४० किलाेमीटर) यांसह हलका ते मध्यम पाऊस सुरूच राहील. तर मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १३ सप्टेंबर रोजी पावसाचा जोर अधिक वाढून काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता लक्षात घेता हवामान विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी व किनारपट्टीवरील नागरिकांनी विशेष दक्षता बाळगावी, अशी सूचना करण्यात आली आहे.









