जिल्हा परिषद शिक्षक भरती; गैरहजर २९ जणांना अंतिम संधी
रत्नागिरी:- पवित्र पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळालेल्या ४७८ शिक्षकांपैकी तीन दिवसांत तब्बल ४५९ शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, या प्रक्रियेत २९ शिक्षक अनुपस्थित राहिले आहेत. या गैरहजर शिक्षकांना कागदपत्र पडताळणीसाठी आजपासून अंतिम संधी देण्यात आली असून, गैरहजर राहिल्यास ते निवडीतून बाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही कागदपत्र पडताळणी प्रक्रिया पार पडली. प्राथमिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, जात प्रमाणपत्र, टीईटी/सीटीईटी गुणपत्रक, अपंगत्व आणि इतर विविध प्रकारच्या ३६ आवश्यक दाखल्यांची कसून तपासणी करण्यात आली. कागदपत्रांची प्राथमिक तपासणी पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांची माहिती आयुक्त कार्यालयाच्या सूचनेनुसार पुढील प्रक्रियेसाठी पाठवली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांचे समुपदेशन करून त्यांना त्याच दिवशी नियुक्ती आदेश दिले जाणार आहेत. यामुळे नव्या शिक्षकांना लवकरच प्रत्यक्ष शाळेवर हजर होता येणार आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसात शिक्षक एकच असल्यामुळे पालकांकडून जिल्हापरिषद प्रशासनाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. पवित्र पोर्टलमधील या भरतीमुळे जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटणार आहे.
कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित शिक्षक
- एकूण उमेदवार ः ४७८
- मराठी माध्यम : ४५७ पैकी ४३८ उपस्थित, १९ गैरहजर
- उर्दू माध्यम : २१ पैकी २० उपस्थित, १ गैरहजर
- एकूण उपस्थित ४५९ शिक्षक.
- एकूण गैरहजर २९ शिक्षक









