सावधान; रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात इसिसची पाळेमुळे रोवण्याची शक्यता?

रत्नागिरी:- ‘इसिस’ या जागतिक दहशतवादी संघटनेने रत्नागिरीतही तळ उभारून बस्तान बसविण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कर्नाटक येथे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) इसिसच्या छावण्यांवर करण्यात आलेल्या कारवाईत ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलिस दलासह गुप्तचर यंत्रणा कामाला लागली आहे. या संघटनेच्या हालचालीवर बारीक नजर आहे.

केरळ, महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसात आदी ठिकाणी दहशतवाद्यांनी बस्तान बसविण्याची जय्यत तयारी केली आहे. काही अतिरेक्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणांनी अटक केल्यानंतर त्यांच्या चौकशीदरम्यान बरीच माहिती उघड झाली. अल्-हिंद अतिरेक्यांनी देश आणि राज्यातील हिंदू नेते, धार्मिक नेते, राजकीय नेते, पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि सेलिब्रिटींची हत्या करण्याची योजना आखली होती, असे एनआयएनची माहिती आहे. ते केरळबरोबर महाराष्ट्रातील रत्नागिरी, गुजरातमधील जांभूसार आदी ठिकाणी तळ स्थापण्याची योजना करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

इसिसच्या या जागतिक संघटनेचे रत्नागिरी जिल्ह्यात पाय पसरण्याची गुप्त माहिती आमच्यापर्यंत आली आहे. पोलिस दल आणि गुप्तचर यंत्रणेसह सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सागरी सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहेत अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड यांनी दिली.