रत्नागिरी:- गेल्या दोन दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात चार पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी जोरदार कारवाई करत सुमारे 10 हजार 531 रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी आदेश दिले होते.
त्यानुसार,देवरुख पोलिस ठाणे येथील पोलिस निरीक्षक निशा जाधव व त्यांच्या पथकाने 6 ऑक्टोबर रोजी बावनदी किनारी जंगलमय भागात कारवाई करत रामकृष्ण धोंडू लाड (49,रा.देवरुख) याच्याकडून 5 हजार 100 रुपयांची गावठी दारु जप्त केली.रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल लाड व त्यांच्या पथकाने 6 आणि 7 ऑक्टोबर रोजी पोमेंडी आणि मिरजोळे या दोन ठिकाणी कारवाई करत केतन जससिंग पिलणकर(44)आणि सुरेश रामचंद्र पारकर (45) या दोघांकडून 3 हजार 966 रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली.
त्याचप्रमाणे पूर्णगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश गावीत आणि त्यांच्या पथकाने मेर्वी येथे कारवाई करत दिपक एकनाथ खरडे (34) याच्याकडून 715 तर चिपळूण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देवेंद्र पोळ आणि त्यांच्या पथकाने पागनाका येथील सुचिता सूरेश सावंत (53)हिच्याकडून 750 रुपयांची गावठी हातभट्टीची दारु जप्त केली. या पाच संशयितांविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या पुढेही अशी कारवाई सुरु ठेवण्यात येणार असून अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत जिल्हा पोलिस अधिक्षक मोहित कुमार गर्ग यांनी दिले आहेत.









