तिहेरी खून प्रकरणातील पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणी
रत्नागिरी:- जयगड येथील बहुचर्चित तिहेरी खून प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाची अखेर पाच दिवसांनंतर सांगता झाली. सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसंबकर आणि मृत तरुणाची आई वंदना जंगम यांनी १५ ऑगस्ट २०२६ पासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे आमरण उपोषण सुरू केले होते.
जयगड येथील तिहेरी खून प्रकरणातील तत्कालीन पोलीस अधिकारी कुलदीप पाटील यांच्या बडतर्फीच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या प्रकरणात न्याय मिळावा आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली होती.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर २० ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता हे उपोषण स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत प्रशासनाने सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली.
दरम्यान, सलग पाच दिवस अन्नाचा कणही पोटात न गेल्याने दोन्ही उपोषणकर्त्या महिलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली होती. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांच्या प्रकृतीची दखल घेत उपोषण सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
२० ऑगस्ट रोजी रात्री रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यानंतर प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.









