देवरुख:- संगमेश्वर तालुक्यातील करंबेळे तर्फे संगमेश्वर शेवरवाडी येथे बिबट्याने कुक्कुटपालन व्यवसायासाठी उभारलेल्या शेडमध्ये प्रवेश करत तब्बल ५० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना मंगळवारी पहाटे घडली. कोंबड्यांच्या आवाजाने बिबट्याने अखेर जंगलात धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून विद्या विनायक नाचरे यांचे हजारोंचे नुकसान झाले आहे.
नाचरे यांचा गेली अनेक वर्षे कुक्कुटपालन व्यवसाय आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्या कुटुंबाचा गाडा हाकतात. मंगळवारी पहाटे बिबट्याने कुक्कुटपालन व्यवसायासाठी उभारलेल्या शेडमध्ये प्रवेश केला अन कोंबड्यांवर हल्ला चढवला. बिबट्याच्या हल्ल्यात ५० हून अधिक कोंबड्या ठार झाल्या आहेत. कोंबड्यांचा आरडाओरड
ऐकून नाचरे यांनी शेडच्या दिशेने धाव घेतली. शेडमध्ये पाहिले असता, बिबट्या कोंबड्यांवर हल्ला चढवताना दिसून आला. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने जंगलात धूम ठोकली.
नाचरे यांना शासनाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या वतीने टॅप कॅमेराही लावण्यात आला होता. मात्र बिबट्या पुन्हा फिरकला नसल्याची माहिती देण्यात आली.









