रत्नागिरी:- महावितरणने वीजचोरीविरोधात राज्यभरात धडक मोहीम सुरू केली असून कोकण प्रादेशिक विभागात सर्वाधिक 7 हजार 496 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. एप्रिलपासून सुरू असलेल्या या मोहिमेत राज्यातील चार प्रादेशिक विभागांत एकूण 19 हजार 599 वीजचोऱ्या उघड झाल्या आहेत.
महावितरणने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजजोडण्यांची तपासणी सुरू केली आहे. कोकण विभागात 7 हजार 496, छत्रपती संभाजीनगर विभागात 4 हजार 597, नागपूर विभागात 4 हजार 521 तर पुणे विभागात 2 हजार 985 वीजचोऱ्या उघडकीस आल्या आहेत. उघड झालेल्या एकूण वीजचोरी प्रकरणांपैकी 15 हजार 965 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, त्यामध्ये 30 कोटी 36 लाख रुपयांची वीजचोरी झाल्याचे निष्पन्न झाले आहे. संबंधित ग्राहकांना वीजचोरीचे बिल देण्यात आले असून, आतापर्यंत 6 हजार 629 ग्राहकांनी 14 कोटी 12 लाख रुपयांचा भरणा केला आहे. याशिवाय 4 हजार 959 प्रकरणांत 1 कोटी 85 लाख रुपयांचे तडजोड शुल्क आकारण्यात आले आहे.
जुलै महिन्यात या मोहिमेला आणखी वेग देण्यात आला. या महिन्यात राज्यभरात 11 हजार 32 वीजचोऱ्या उघडकीस आल्या. त्यात कोकण विभागातील तब्बल 4 हजार 84 वीजचोऱ्यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात 2 हजार 365, नागपूरमध्ये 2 हजार 324 आणि पुणे विभागात 2 हजार 259 वीजचोऱ्या आढळल्या. जुलैमध्ये आढळलेल्या वीजचोरीपैकी 8 हजार 462 प्रकरणांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून, 15 कोटी 11 लाख रुपयांच्या वीजचोरीचे बिल संबंधितांना देण्यात आले आहे. त्यापैकी 3 हजार 36 प्रकरणांत 6 कोटी 22 लाख रुपयांचा भरणा झाला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये चोरीच्या युनिटनुसार वीजबिल आणि दंडात्मक तडजोड शुल्क आकारण्याचे काम सुरू आहे.
थेट विजेच्या तारेवर हूक टाकणे तसेच मीटरमध्ये फेरफार करून वीज वापरण्याच्या प्रकारांवर महावितरणकडून विशेष लक्ष दिले जात आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या जोडण्यांचीही तपासणी सुरू असून, अन्य ठिकाणाहून वीजवापर केल्याचे आढळल्यास संबंधितांवर वीजचोरीची कारवाई केली जात आहे. वीजचोरीची रक्कम दंडासह मुदतीत भरली नाही तर भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 135नुसार फौजदारी कारवाई केली जात आहे. या कलमानुसार वीजचोरीच्या गुन्ह्यासाठी दंडासह तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद आहे.









