Tuesday, August 18, 2026
spot_img
Home रत्नागिरी महामार्गावरील निवळी, लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुले होणार

महामार्गावरील निवळी, लांजा उड्डाणपूल आठवडाभरात खुले होणार

चाकरमान्यांचा प्रवास होणार अधिक सुकर आणि वेगवान

रत्नागिरी:- कोकणच्या विकासाची भाग्यरेषा असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी आणि प्रवासी वर्गासाठी अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे! गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचे आणि बहुप्रतिक्षित निवळी पूल आणि लांजा उड्डाणपूल येत्या अवघ्या आठवडाभरात वाहतुकीसाठी खुले करण्याची जोरदार तयारी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सुरू केली आहे. हे दोन्ही पूल सुरू झाल्यास यावर्षीच्या गणेशोत्सवात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर आणि वेगवान होणार आहे.

रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथील पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. तब्बल १२ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला हा पूल ८० मीटर लांबीचा असून, त्याला ६२० मीटरचे जोड रस्ते जोडण्यात आले आहेत. असा एकूण ७०० मीटरचा हा संपूर्ण प्रकल्प आता प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. निवळी पुलाखाली एकूण ४ गाळे (खांब) उभारण्यात आले आहेत. हा पूल सुरू झाल्यामुळे महामार्गावरील नागमोडी वळणे आणि वाहतुकीची कोंडी कायमची इतिहासजमा होणार आहे.

दुसरीकडे, लांजा शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सुमारे ७० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला ९७५ मीटर लांबीचा लांजा उड्डाणपूल देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यासाठी तयार आहे. या भव्य पुलाखाली तब्बल ४५ गाळे (खांब) उभारण्यात आले आहेत. लांजा शहरातील बाजारपेठेतील ट्रॅफिक जॅमचा फटका आता चाकरमान्यांना बसणार नाही. येत्या सात दिवसांत हा पूल सुरू करण्यासाठी बांधकाम विभाग अहोरात्र मेहनत घेत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप ते परशुराम या महत्त्वाच्या मार्गावरील बहुतांश पुलांची बांधकामे आता पूर्णत्वाकडे गेली आहेत. निवळी आणि लांजा हे दोन्ही प्रमुख पूल एकाच वेळी सुरू झाल्यास कोकणातील दळणवळणाला नवी गती मिळणार असून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.

निवळी आणि लांजा पुलांमुळे एकीकडे आनंदाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे चिपळूण शहरातील उड्डाणपुलाबाबत मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. चिपळूण पुलाची सद्यस्थिती पाहता हा पूल यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी सुरू होणे जवळपास अशक्य मानले जात आहे. त्यामुळे चिपळूण शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न यंदाही कायम राहण्याची शक्यता आहे. तरीही, निवळी आणि लांजा हे दोन महत्त्वाचे उड्डाणपूल आठवडाभरात सुरू होत असल्याने कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास यंदा नक्कीच अधिक सुखकर आणि आरामदायी होणार आहे