सक्षम अधिकाऱ्याकडून भेट न दिल्याचा आरोप
रत्नागिरी:- भारताच्या ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी अनेकांनी उपोषण सुरू केले. उपोषणकर्त्यांपैकी काही जणांनी माघार घेतली मात्र, सक्षम अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी येऊन भेट न दिल्याने तिघा उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण दुसऱ्या दिवशी देखील कायम ठेवले होते.
रत्नागिरी तालुक्यातील ओरी येथील प्रमोद देवदास जाधव यांनी स्थानिक रिक्षा चालकांकडून व्यवसाय करण्यास होत असलेल्या अटकावाविरोधात उपोषण मांडले. अधिकृत रिक्षा स्टॅन्डऐवजी अन्यत्र रिक्षा लावल्या जात असून आपल्यालाही व्यवसाय करू द्यावा व संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी होती. आरटीओ विभागाचे अधिकारी यांनी केवळ तकलादू उत्तरे दिल्याने त्यांनी आपण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचा निर्धार दुसऱ्या दिवशीही व्यक्त केला आहे.
दुसरीकडे, गवळीवाडा येथील इम्रान शेख यांनी राजापूर अर्बन बँकेने फसवणूक केल्याचा आरोप करत अधिकारी आणि संचालक मंडळावर कारवाईची मागणी करत स्वातंत्र्य दिनापासून उपोषण छेडले आहे. त्यांच्या उपोषणाकडे देखील बँकेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्री 12 वाजता बँकेचा प्रतिनिधी पाठवून कोणतेही ठोस आश्वासन न देता उपोषणकर्त्यांची चेष्टा सुरू ठेवल्याचा आरोप यावेळी शेख यांनी केला आहे.
याशिवाय, जयगड येथील तिहेरी खून प्रकरणात सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप पवार यांच्यावर कारवाई करावी यासाठी संध्या कोसुबकर व वंदना जंगम यांनी उपोषण सुरू केले असून दुसऱ्या दिवशी देखील हे उपोषण सुरूच होते.









