Monday, August 10, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरातील पोस्टात स्वीकारणार महानगर गॅसची बिले

रत्नागिरी शहरातील पोस्टात स्वीकारणार महानगर गॅसची बिले

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील महानगर गॅसच्या ग्राहकांसाठी भारतीय डाक विभागाने एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आता शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये महानगर गॅसची मासिक बिले स्वीकारली जाणार असून, या निर्णयामुळे शहरातील सुमारे १०,००० ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. शहराच्या विविध भागात राहणाऱ्या ग्राहकांना पूर्वी बिल भरण्यासाठी दूरवर जावे लागत होते.

नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन महानगर गॅस आणि भारतीय डाक विभाग यांच्यात १० ऑगस्ट रोजी सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर रत्नागिरी विभागाचे डाक अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी आणि महानगर गॅस लिमिटेडचे जीएम हेड आशिष प्रसाद यांनी स्वाक्षऱ्या केल्या. यामुळे रत्नागिरी प्रधान डाकघर, कलेक्टरेट, शिवाजीनगर, एमआयडीसी यासह शहरातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये ही सुविधा तात्काळ लागू झाली असून, ग्राहकांचा वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचणार आहे.

या महत्त्वपूर्ण सुविधेसोबतच रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये आधार नोंदणी आणि अद्ययावतीकरणाचे काम देखील वेगाने सुरू आहे. शासकीय योजना, बँकिंग, शैक्षणिक प्रवेश आणि इतर कामांसाठी आधार कार्ड अत्यावश्यक असल्याने नागरिक पोस्ट ऑफिसमधील केंद्रांना प्राधान्य देत आहेत. पारदर्शक कार्यपद्धती आणि निश्चित शुल्कामुळे टपाल विभागावर नागरिकांचा विश्वास वाढला आहे. चालू वर्षात प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत ५,५८४ विद्यार्थी आणि ५५२ नागरिकांना आधारविषयक सेवा देण्यात आल्या आहेत. एकाच वेळी ४० पेक्षा जास्त ग्राहकांसाठी विशेष आधार कॅम्प आयोजित करायचा असल्यास ८६६९९१९८६० या व्हॉट्सॲप क्रमांकावर संदेश पाठवण्याचे आवाहन डाक विभागाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी प्रधान डाकघर, राजापूर, देवरुख, लांजा, साखळी, संगमेश्वर, सैतवडा, पाली, खारेपाटण यासह जिल्ह्यातील अनेक पोस्ट ऑफिसमध्ये नवीन नोंदणी, बायोमेट्रिक सुधारणा, नाव व मोबाईल क्रमांक बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे.
दरम्यान, येत्या २८ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी डाक विभाग भावा-बहिणीचा स्नेह सुरक्षितपणे वाहून नेण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. दूर राहणाऱ्या भावांपर्यंत राखी पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांमध्ये विशेष रंगीत राखी पाकिटे अवघ्या १२ रुपयांत विक्रीस उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गेल्या वर्षी टपाल विभागाने १८,७५२ राखी पाकिटांची विक्री केली होती. तसेच साध्या पोस्टाने २८,७५९ तर स्पीड पोस्ट व नोंदणीकृत पोस्टाने ७,६५४ राख्या देशांतर्गत पाठवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे रशिया, अमेरिका, युरोप आणि आखाती देशांमध्ये १०० हून अधिक राख्या पाठवून परदेशातही प्रेम पोहोचवण्याची कामगिरी केली गेली. चालू वर्षात शाळांना भेटी देऊन ‘जवानांसाठी राखी’ उपक्रमही राबवला जात आहे. नागरिकांनी, विशेषतः माता-भगिनींनी वेळेत व सुरक्षितपणे राखी पाठवण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसच्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी आणि जीएम आशिष प्रसाद यांनी संयुक्तपणे केले आहे.