चिपळूण:- शहरातील मार्कंडी परिसरातील एका बालरुग्णालयात उपचारासाठी आणलेल्या पाच वर्षीय बाळाचा गुरुवारी ६ ऑगस्ट रोजी रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर उपचारात हलगर्जीपणा झाल्याने बाळाचा मृत्यू झाल्याची चर्चा शहरात पसरल्यानंतर नागरिक, पत्रकार, नगरसेवक तसेच डॉक्टर रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
परशुराम नगर येथे राहणारे नवनीत नरळकर व त्यांच्या पत्नी साक्षी हे त्यांचा पाच वर्षीय मुलगा रियांश नवनीत नरळकर याला गुरुवारी उपचारासाठी मार्कंडी येथील बालरुग्णालयात घेऊन गेले होते. उपचारानंतर प्रकृती सुधारल्याने डॉक्टरांच्या सूचनेनुसार त्याला घरी नेण्यात आले. मात्र, प्रकृती बिघडल्यास पुन्हा रुग्णालयात आणण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.
दरम्यान, दुपारी रियांशला पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला रिक्षाने दुसऱ्या दवाखान्यात नेण्यात आले. उपचारानंतर प्रकृती स्थिर वाटल्याने त्याला पुन्हा घरी आणण्यात आले. रात्री तो घरी खेळत असताना अचानक त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला तातडीने मार्कंडी येथील बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याची प्रकृती अत्यवस्थ होती. तपासणीनंतर इन्फेक्शनमुळे शरीरातील पाणी कमी झाल्याने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल व व्हिसेरा अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
रियांशच्या मृत्यूची माहिती मिळताच नगरसेवक साजिद सरगुरोह, नगरसेवक शशिकांत मोदी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रुग्णालयात दाखल झाले. वातावरण तणावपूर्ण होत असल्याने चिपळूण पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. आयएमए संघटनेचे पदाधिकारी डॉक्टरदेखील रुग्णालयात आले. यावेळी डॉक्टर व उपस्थित नागरिकांमध्ये चर्चा झाली. डॉक्टरांनी आपली बाजू स्पष्ट केली. एकुलता एक मुलगा गमावल्याने नरळकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रियांशच्या आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
या प्रकरणी पोलिसांनी नोंद करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केल्यानंतर तेजस नरळकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
गुरुवारी रात्री उशिरा रियांशचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
रियांशच्या पश्चात आई-वडील, आजी-आजोबा, काका-काकी असा परिवार आहे. या घटनेने चिपळूण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आणि व्हिसेरा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.









