Saturday, August 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी साळवी स्टॉप नजीक भरधाव दुचाकीची धडक

साळवी स्टॉप नजीक भरधाव दुचाकीची धडक

माय-लेकासह दोघे जखमी, गुन्हा दाखल

रत्नागिरी:- शहरातील साळवी स्टॉप ते नाचणे जाणारे लिंक रोडवर बेदरकारपणे दुचाकी चालवून समोरून येणाऱ्या गाडीला धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात माय-लेकासह दोघे जण गंभीर जखमी झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पोलीस हवालदार गौरी योगेश सुर्वे (वय ४०, नेमणूक- रत्नागिरी शहर पोलीस ठाणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. १६ जुलै रोजी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी सोहम अशोक पानकर (वय १९, रा. नाचणे वाडेकर वाडी) हा आपली सुझुकी कंपनीची ॲक्सेस १२५ (क्र. MH-08/BL-2507) ही मोटर सायकल घेऊन साळवी स्टॉपकडून नाचणेकडे जात होता.

या दुचाकीच्या मागे-पुढे नंबर प्लेट नव्हती तसेच दोन्ही बाजूस आरसेही नव्हते. असे असतानाही आरोपीने वाहतुकीच्या नियमांकडे आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपली दुचाकी अतिशय हयगईने, बेदरकारपणे व इतरांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रीतीने चालवली. त्याने गाडी उजव्या बाजूला नेऊन समोरून (नाचणे दिशेकडून) येणाऱ्या हिरो एचएफ डिलक्स (क्र. MH-08/BA-7085) या गाडीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात हिरो एचएफ डिलक्स चालवणारे प्रतीक प्रकाश पोयनाडकर (वय २६) आणि त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या आई प्राची प्रकाश पोयनाडकर (वय ४९, दोन्ही रा. फ्लॅट नं. १०१, सिद्धिविनायक हाऊसिंग सोसायटी, गोडावून स्टॉप, नाचणे, ता. व जि. रत्नागिरी) हे गंभीर व लहान-मोठ्या दुखापतीमुळे जखमी झाले आहेत. तसेच अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून, आरोपी चालक सोहम पानकर हा स्वतःही या अपघातात किरकोळ व गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपी दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.