उघड्या विहिरी, रस्ते अपघात, फासकी, उपासमारी ठरताहेत बिबट्यांचे प्रमुख शत्रू
रत्नागिरी:- कोकणच्या निसर्गवैभवाचे प्रतीक असलेला बिबट्या आज स्वतःच्या अस्तित्वासाठी झुंज देत आहे. वाढता मानव-वन्यजीव संघर्ष, जंगलांची होणारी तोड, वाढते रस्ते जाळे आणि नैसर्गिक अधिवासावर होत असलेले अतिक्रमण यामुळे रत्नागिरी परिक्षेत्रातील बिबट्यांवर अभूतपूर्व संकट कोसळले आहे.
२०१५ ते २०२५ या ११ वर्षांच्या कालावधीत तब्बल ९० बिबट्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला असून ही आकडेवारी वन्यजीव संवर्धनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. मात्र, या काळात वन विभागाने धाडसी आणि तत्पर बचावमोहीम राबवत ७५ बिबट्यांना मृत्यूच्या दाढेतून वाचवून पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे.
वन विभागाकडील आकडेवारीनुसार, २२ बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. तर रस्ते अपघात २१, उपासमारीमुळे १६, उघड्या विहिरीत पडून १४, जखमी होवून ७, शिकारीमध्ये २ तसेच इतर कारणांमुळे ८ बिबट्याचा मृत्यू झाला आहे. विशेषतः जंगलातून जाणाऱ्या महामार्गांवर वेगाने धावणारी वाहने आणि मानवी अतिक्रमणामुळे बिबट्यांचा जीव धोक्यात येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
२०२० हे वर्ष बिबट्यांसाठी सर्वाधिक काळे वर्ष ठरले. या एका वर्षातच १८ बिबट्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, २०२४ मध्ये वन विभागाने विक्रमी १६ बिबट्यांची यशस्वी सुटका करत वन्यजीव संरक्षणातील आपली कार्यक्षमता सिद्ध केली. संकटात सापडलेल्या ७५ बिबट्यांपैकी तब्बल ४८ बिबटे उघड्या विहिरीत पडलेले, १८ बेकायदेशीर फासक्यांमध्ये अडकलेले, तर ९ इतर अडचणीत सापडलेले होते.जीवाची पर्वा न करता वन कर्मचाऱ्यांनी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नांमुळे या सर्व बिबट्यांना सुरक्षितपणे बाहेर काढून पुन्हा जंगलात सोडण्यात आले.
वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, उघड्या विहिरींना कठडे किंवा जाळ्या बसवणे, जंगलातून जाणाऱ्या रस्त्यांवर वेगमर्यादा आणि वन्यजीव अंडरपास उभारणे, तसेच बेकायदेशीर फासक्या लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे ही काळाची गरज असल्याचे मत प्राणी प्रेमींनी व्यक्त केले आहे. बिबट्यांचे संरक्षण ही केवळ वन विभागाची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. निसर्गाचा समतोल राखायचा असेल, तर जंगल आणि वन्यजीवांचे संवर्धन हीच काळाची हाक आहे. अन्यथा, कोकणच्या जंगलातील बिबट्याची डरकाळी इतिहासजमा होण्याची भीती नाकारता येणार नाही.









