Monday, July 27, 2026
spot_img
Home लांजा लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

लांज्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला

लांजा:- लांजा शहरातील सार्दळवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी मिळून चार वर्षांच्या चिमुकलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात चिमुकली गंभीर जखमी झाली असून, शहरात भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

​सार्दळवाडी येथील स्वंभवी समीर तानवडे (वय ४ वर्ष) ही चिमुकली आज सकाळी शेजारच्या घरात जात असताना, अचानक १० भटक्या कुत्र्यांनी तिच्या अंगावर धाव घेतली. या झुंडीने तिच्या पाठीला आणि हाताला जोरात चावा घेतला. झुंडीने केलेल्या या अचानक हल्ल्यामुळे मुलगी प्रचंड घाबरली.
​तिने आरडाओरडा केल्यामुळे पालकांनी तातडीने धाव घेऊन कुत्र्यांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. घराच्या जवळच हा प्रकार घडल्याने मोठा अनर्थ टळला असून मुलगी थोडक्यात बचावली आहे.

शहरातील कुत्रे आता इतके निर्ढावले आहेत की, त्यांना कशाचीही भीती राहिलेली नाही. ते थेट नागरिकांच्या अंगावर धावून जात आहेत.
शहरात आणि बाजारपेठेत कुत्रे झुंडीने फिरत असतात. त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास ते उलट अंगावर येतात, ज्यामुळे नागरिकांमध्ये अधिक भीती निर्माण झाली आहे. शहरात कुत्र्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर वाढल्याने लहान मुलांना एकटे घराबाहेर पाठवणे अत्यंत धोकादायक बनले आहे.

लांजा नगरपंचायतीने तातडीने भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण मोहीम राबवावी. नागरिकांच्या सुरक्षेसाठी भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तातडीने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद भाईशेट्ये यांनी केली आहे.