Monday, July 27, 2026
spot_img
Home रत्नागिरी निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा; ६० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त

निवेंडी एमआयडीसीचा मार्ग मोकळा; ६० कोटींचा निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त

रत्‍नागिरी:- तालुक्‍यातील निवेंडी येथे प्रस्‍तावित एमआयडीसीसाठी दोन वर्षापूर्वी घोषणा झाल्‍यानंतर भूसंपादन प्रक्रियाही राबवण्‍यात आली होती. मात्र निधी अभावी ही एमआयडीसीचे भूसंपादन रखडले होते. मात्र शासनाकडून आता निधीचा प्रश्‍न मार्गी लागला असून 95 हेक्‍टर जागेसाठी लागणार्‍या 120 कोटी पैकी 60 कोटी रुपये जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाले आहेत. त्‍यामुळे निवेंडी एमआयडीसीचा प्रश्‍न लवकरच मार्गी लागण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्‍न सुरु झाले आहेत.

विधानसभा निवडणुकीपूर्वी निवेंडी येथे एमआयडीसी उभारण्‍याची घोषणा शासनाकडून झाली होती. यावेळी निवेंडी पंचक्रोशीतील जागांची मोजणी होऊन भूसंपादन प्रक्रियाही राबवण्‍यात आली होती. त्‍यावेळी 105 हेक्‍टर जागेचे भूसंपादन केले जाणार होते. मात्र आता 95 हेक्‍टरवरती निवेंडी एमआयडीसी उभारणीच्‍या हालचाली सुरु झाल्‍या आहेत.
या एमआयडीसीसाठी राज्‍याचे उद्योगमंत्री आणि जिल्‍ह्याचे पालकमंत्री, या मतदार संघाचे आमदार उदय सामंत विशेष प्रयत्‍नशील होते. जिल्‍ह्यात मोठ्याप्रमाणात आंबा, काजूचे उत्‍पादन होते. या उत्‍पादनावर प्रक्रिया करण्‍यासाठी मोठे प्रकल्‍प याठिकाणी यावेत यासाठी त्‍यांचे प्रयत्‍न सुरु होते. फळप्रक्रिया प्रकल्‍प याठिकाणी झाल्‍यास येथील तरुणांनाही रोजगार उपलब्‍ध होईल, आंबा, काजू व कोकणी मेव्‍यालाही चांगला भाव मिळेल हा त्‍यामागील हेतू होता.

मात्र निधी अभावी एमआयडीसी भूसंपादन रखडले होते. परंतु शासनाने आता यासाठी निधी उपलब्‍ध करुन देण्‍यास सुरुवात केली आहे. 95 हेक्‍टर जागेसाठी 120 कोटी रुपये लागणार असून पहिल्‍या टप्‍प्‍यात 60 कोटीचा निधी जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाला आहे. त्‍यामुळे निवेंडी एमआयडीसी मार्गी लागण्‍याच्‍या दृष्‍टीने आता खर्‍या अर्थाने पावले पडली आहेत.