Thursday, July 23, 2026
spot_img
Home राजापूर रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या १२ महिलांना न्यायालयाचा दणका

रस्त्यावर मासेविक्री करणाऱ्या १२ महिलांना न्यायालयाचा दणका

प्रत्येकी दोन हजारांचा दंड

राजापूर:- सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री करून परिसरात दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी राजापूर न्यायालयाने १२ महिला मासेविक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. सर्व महिलांनी न्यायालयात गुन्ह्याची कबुली देत दंडाची रक्कम भरल्याने त्यांची कारावासाची शिक्षा टळली.

शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ या मुख्य मार्गावर १३ मार्च २०२६ रोजी सकाळी मासेविक्री सुरू असल्याची तक्रार राजापूर नगर परिषदेने केली होती. मासे स्वच्छ करताना त्यातील खवले आणि सांडपाणी थेट रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत होती तसेच अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली होती. नगर परिषदेकडून मासेविक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात आली असतानाही संबंधित महिलांकडून सार्वजनिक ठिकाणीच विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.

यानंतर राजापूर पोलिसांनी महाराष्ट्र नगरपालिकां, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ मधील संबंधित तरतुदी तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत १२ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हाके यांच्या न्यायालयात झाली.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने प्रत्येक महिलेला दोन हजार रुपयांचा दंड ठोठावत दंड न भरल्यास सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. मात्र, सर्व महिलांनी तातडीने दंडाची रक्कम भरल्याने कारावास टळला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केला असून न्यायालयीन कामकाजात कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सचिन बळीप यांनी भूमिका बजावली.