आरोग्य यंत्रणेच्या दुरवस्थेविरोधात जनआक्रोश
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्यात एका बाजूला विकासकामांच्या नावाखाली करोडो रुपयांचा निधी खर्च केला जात असल्याचा दावा केला जात असताना, दुसऱ्या बाजूला मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न वाऱ्यावर सोडला गेला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाला सर्वसामान्यांच्या आरोग्य व्यवस्थेकडे पाहायला वेळ नसल्याचा गंभीर आरोप करत, या निष्काळजी कारभाराविरोधात बुधवार २२ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर ‘धडक मोर्चा’ काढण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सध्या व्हेंटिलेटरवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य केंद्रांच्या धोकादायक इमारती, डॉक्टरांची तीव्र टंचाई, कर्मचाऱ्यांची रिक्त असलेली शेकडो पदे आणि मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव यांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. “आरोग्य हा आमचा मूलभूत अधिकार आहे” या भावनेतून जिल्हा परिषद प्रशासनाला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
“कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही जर रुग्णांना वेळेवर उपचार आणि साध्या सुविधा मिळत नसतील, तर हा विकास नेमका कोणासाठी? प्रशासनाला झोपेतून जागे करण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी हा लढा आहे,” अशी टीका आंदोलनाचे संयोजक प्रथमेश गावणकर यांनी केली आहे. तालुक्यातील सर्व सुज्ञ, जागरूक आणि हक्कासाठी लढणाऱ्या नागरिकांनी या धडक मोर्चाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपले योगदान द्यावे, असे आवाहन प्रथमेश गावणकर यांनी केले आहे.









