१२ वीचा २०.९०%, तर १० वीचा १२.२६% निकाल
रत्नागिरी:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या कोकण विभागीय मंडळाचा इयत्ता १० वी आणि १२ वीचा जून-जुलै २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज, मंगळवारी दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरवणी परीक्षेत इयत्ता १२ वीचा एकूण निकाल २०.९० टक्के, तर १० वीचा निकाल १२.२६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन्ही इयत्तांच्या निकालात मोठी घट झाली असून १० वीच्या निकालात ११.३९ टक्के आणि १२ वीच्या निकालात ११.१५ टक्क्यांची घसरण झाली आहे.
निकालाच्या सांख्यिकीय विश्लेषणात यंदाही दोन्ही इयत्तांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारल्याचे स्पष्ट झाले आहे. १० वीच्या परीक्षेत २१.४२ टक्के मुली तर ९.०४ टक्के मुले उत्तीर्ण झाली. १२ वीतही २८ टक्के मुलींच्या तुलनेत १७.९७ टक्के मुले उत्तीर्ण झाली. जिल्हावार विचार केला असता, १० वी मध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल १६.२० टक्के तर सिंधुदुर्गचा निकाल अव्वल न राहता केवळ ४.४४ टक्के लागला. मात्र, १२ वी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने २४.६७ टक्क्यांसह रत्नागिरीला (१९.८१%) मागे टाकले. १२ वीच्या शाखानिहाय निकालात सर्वाधिक टक्केवारी विज्ञान शाखेची (३४.०८%) राहिली, तर वाणिज्य (१४.५४%), कला (१५.०६%), व्यावसायिक (८.३३%) आणि टेक्निकलचा निकाल शून्य टक्के लागला.
परीक्षेला प्रविष्ट झालेल्या ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी असेल, त्यांच्यासाठी बुधवार, दिनांक १५ जुलै ते शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर नेट बँकिंग, यूपीआय किंवा कार्डद्वारे शुल्क भरून विद्यार्थी अर्ज करू शकतात. नियमानुसार पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे बंधनकारक राहील, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
परीक्षा पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संपूर्ण परीक्षा कालावधीत ४ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली होती आणि सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही बंधनकारक होते. परीक्षा सुरू असताना एकही गैरमार्ग प्रकार आढळला नाही; मात्र परीक्षोत्तर कालावधीत पडताळणी दरम्यान एकूण ५ गैरमार्ग प्रकरणे निदर्शनास आली. यामध्ये १० वीच्या ४ (रत्नागिरी-३, सिंधुदुर्ग-१) आणि १२ वीच्या १ (रत्नागिरी) प्रकरणाचा समावेश आहे. दरम्यान, कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व प्रभारी विभागीय सचिव प्रेरणा शिंदे यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी खचून न जाता नव्या उमेदीने प्रयत्न करावेत, असा दिलासा दिला आहे.









