ना. उदय सामंत यांचा खळबळजनक दावा
रत्नागिरी:- राज्यातील आगामी राजकीय भूकंपाचे संकेत देत, राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे सुपुत्र उदय सामंत यांनी विरोधकांना थेट इशारा दिला आहे. “आमचे ‘ऑपरेशन टायगर’ आणि ‘ऑपरेशन वन, टू, थ्री’ इथेच थांबणार नाही, तर अजून अनेक मोठी ऑपरेशन्स व्हायची बाकी आहेत,” असा खळबळजनक दावा त्यांनी सोमवारी येथे केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात होत असणारे प्रवेश ही निरंतर प्रक्रिया असल्याचे सांगत, अनेक नगरसेवक, माजी आमदार, माजी खासदारांसह महाविकास आघाडीतील (मविआ) काही विद्यमान आमदारही आमच्या संपर्कात असून सोबत येण्यास तयार आहेत, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
आज विविध राजकीय घडामोडींवर प्रसारमाध्यमांशी बोलताना उदय सामंत यांनी कन्हैया कुमार यांच्या वक्तव्यांपासून ते ‘लाडकी बहीण’ योजनेच्या आक्षेपांपर्यंत आणि विनायक राऊत यांच्या कौटुंबिक वादावर अत्यंत सूचक आणि धारदार विधाने करत विरोधकांना चारीमुंड्या चीत केले.
काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्या टीकेला उत्तर देताना सामंत यांनी त्यांच्यावर जोरदार कडाडून प्रहार केला. “कन्हैया कुमारचे नाव जरी कन्हैया कुमार असले, तरी तो अजूनही अत्यंत अपरिपक्व, म्हणजेच ‘कुमार कन्हैयाच’ आहे. केवळ भाषण करता येणे आणि कोणावरही टीका करण्याचा धंदा मांडणे योग्य नाही. लाईमलाईट आणि राजकीय मायलेज मिळवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोलण्याआधी स्वतःच्या वयाचे भान ठेवावे. कन्हैया कुमारने आधी स्वतः ग्रामपंचायतीला निवडून येऊन दाखवावे, शिंदे साहेबांवर बोलण्यासाठी आमचा एक ‘गटप्रमुख’ सुद्धा त्याला बास आहे,” असा टोला सामंत यांनी लगावला.
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यावर आणि नागपुरातील रामरक्षा पठणावर बोलताना उदय सामंत यांनी ‘उशिरा सुचलेले शहाणपण’ म्हणत उपरोधिक टोला लगावला. “फारच लवकर पाठिंबा दिला! तब्बल सोळाव्या दिवशी पाठिंबा जाहीर केला, यावरूनच त्यांची तत्परता दिसते. राम मंदिर बांधू नये असे सांगणाऱ्या काँग्रेसच्या मांडीवर जे लोग जाऊन बसलेत, त्यांनी आता आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. नागपुरात रामरक्षा पठण करणाऱ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, पण तुम्ही काहीतरी केले म्हणून मी तुमच्या घरासमोर येणार, हा शालेय शिक्षणातील खेळासारखा प्रकार आहे. यांचे सगळेच निर्णय उशिरा असतात,” अशी टीका त्यांनी केली.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत बोलताना सामंत यांनी विरोधकांचे वाभाडे काढले. “विरोधक केवळ वगळलेल्या नावांची आणि संख्येची नकारात्मक चर्चा करत आहेत. मात्र या योजनेतून किती कोटी भगिनींना थेट फायदा मिळतोय, हे सांगण्याचे धाडस त्यांच्यात नाही. काही ठिकाणी अनावधानाने नोकरी करणाऱ्या महिलांचे तर काही ठिकाणी पुरुषांच्या नावाने फॉर्म भरले गेले होते. असे आक्षेपार्ह फॉर्म केवळ तांत्रिक तपासणीसाठी बाजूला ठेवले आहेत. सरकारने कोणत्याही पात्र महिलेला योजनेपासून वंचित ठेवलेले नाही. विरोधक केवळ राजकीय खेळी खेळत आहेत,” असा खुलासा त्यांनी केला.
ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत आणि अयोध्या पोळ यांच्या संदर्भातील वादावर बोलताना सामंत यांनी राजकीय प्रगल्भता दाखवली. “विनायक राऊत यांच्या घरातील तो कौटुंबिक विषय असून सध्या न्यायालयात आहे. त्यांनी आणि संबंधित व्यक्तीने यावर खुलासा केला आहे. माझ्यावर चांगले संस्कार असल्याने मी अशा कौटुंबिक विषयांचे राजकीय भांडवल करू इच्छित नाही. जे काही योग्य असेल त्यावर पोलीस किंवा न्यायालय निर्णय देईल. कुणाच्याही वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याची प्रथा आणि संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाही. मला केवळ माझ्या पक्षाची भूमिका मांडण्यात रस आहे,” असे सामंत यांनी स्पष्ट केले. तर भाजप नेते नितेश राणे यांच्या अमीर खान संदर्भातील वक्तव्यावर, “ते योग्य की अयोग्य हे भाजपचे नेते सांगू शकतील, मात्र कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात शिरून राजकीय फायदा घेण्याची माझी वृत्ती नाही,” असे म्हणत त्यांनी स्वतःची भूमिका तटस्थ ठेवली.
राम मंदिर प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मागवलेल्या खुलाश्यावर बोलताना त्यांनी न्यायालयाच्या सिस्टीमवर भाष्य करणे टाळले आणि न्यायालयात याचिका असेल तर न्यायालयाने खुलासा मागवणे यात काहीही वागवे नाही, असे सांगितले. तसेच एटीएसने केलेल्या कारवाईचे कौतुक करताना ते म्हणाले की, “दहशतवाद्यांच्या मनात मोठा कट शिजत असताना, कोणताही प्रसंग घडण्यापूर्वीच पोलीस दलाने केलेल्या ८ ते १० जणांच्या अटकेची कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहे. त्यांच्या चौकशीतून अनेक मोठ्या गोष्टी समोर येतील.”









