कमी पटसंख्या, पण यशाचा मोठा टप्पा
रत्नागिरी:- नुकत्याच पार पडलेल्या ‘मंथन’ राज्यस्तरीय परीक्षेत जिल्हा परिषद शाळा निरुळ नंबर २ (ठिकवाडी) येथील दोन गुणवंत विद्यार्थिनींनी आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. मंथन परीक्षेत घवघवित यश संपादन केल्याबद्दल आरोही सतीश ठीक आणि आर्या मंगेश ठीक या विद्यार्थिनींचा सत्कार निधी पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला.
एकीकडे ग्रामीण भागातील शाळांची पटसंख्या कमी होत असताना, निरुळ नंबर २ शाळेने मात्र आपल्या शैक्षणिक गुणवत्तेत सातत्य राखले आहे. कमी पटसंख्या असूनही विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शाळेने केलेले प्रयत्न सध्या कौतुकाचा विषय ठरत आहेत. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम बनवण्यासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत फळाला आली आहे.
या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक पंकज जोशी आणि सहशिक्षिका तृप्ती साळवी-सावंत (सध्या बीएलओ म्हणून कार्यरत) यांच्या मार्गदर्शनाला जाते. या दोन्ही शिक्षकांनी मुलांच्या प्रगतीसाठी घेतलेली विशेष मेहनत आणि पालकांचा वाढता विश्वास यामुळेच शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली आहे, अशी भावना परिसरातून व्यक्त होत आहे. रविवारी या दोन्ही विद्यार्थिनींचा विशेष गौरव करण्यात आला. कमलाबाई विसपुते इंग्लिश मिडीयम स्कूल कुवारबाव या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदा शेलार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून निधी पटवर्धन या उपस्थित होत्या. शाळेच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करण्यात येत आहे.









