गंभीर जखमी वृद्ध उपचारांसाठी मदतीपासून वंचित
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील पोस्ट ऑफिस समोरील रस्त्यावर भरधाव कारने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ६७ वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाले असून, आरोपी वाहनचालकाने उपचारांचा खर्च देण्यास टाळाटाळ केल्याने अखेर त्यांच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमर नारायण सागवेकर (रा. जयगड) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी चन्ना बसाय्यासिद्धाय्या स्वामी (वय ६७, मूळ रा. कर्नाटक, सध्या रा. रत्नागिरी) हे २३ मार्च २०२६ रोजी सकाळी ११.३० च्या सुमारास लक्ष्मी चौक गाडीतळ ते गोखले नाका या मार्गाने रस्त्याच्या डाव्या बाजूने पायी चालत जात होते. त्यावेळी पोस्ट ऑफिससमोर आले असता, मागून आलेल्या कारने (क्र. एमएच ०८ ए. एन. १३१३) त्यांना जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत चन्ना स्वामी हे रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. त्यांना शरीराच्या विविध भागांत गंभीर तसेच किरकोळ दुखापत झाली. या अपघातानंतर आरोपी चालकाने त्यांना उपचारांसाठी कोणतीही मदत केली नाही किंवा औषधोपचाराचा खर्च दिला नाही. बराच काळ उलटूनही मदतीसाठी टाळाटाळ होत असल्याने १० जुलै रोजी फिर्यादीने पोलिसांत धाव घेतली.
फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमर सागवेकर याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.









