Wednesday, August 26, 2026
spot_img
Home खेड जगबुडीच्या पुरामुळे अलसुरेच्या ४०० ग्रामस्थांचा जीव टांगणीला

जगबुडीच्या पुरामुळे अलसुरेच्या ४०० ग्रामस्थांचा जीव टांगणीला

खेड:- जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने आता रौद्ररूप धारण केले असून खेड तालुक्यात पूरस्थिती अत्यंत भयानक झाली आहे. आधीच मुंबईहून गोव्याच्या दिशेनं जाणाऱ्या 8 ठिकाणांवर दरड कोसळल्या आहेत. त्यामुळे वाहतूक बऱ्यापैकी ठिकाणी विस्कळीत झाली आहे. खाडीपट्टा विभागातील अलसुरे गावातील मोहल्ल्याला जगबुडी नदीच्या महापुराने चारही बाजूंनी वेढलं. पुराच्या पाण्याच्या वेढ्यामुळे हा अख्खा मोहल्ला सध्या एका बेटासारखा दिसत असून गेल्या २० तासांपासून या भागाचा गावाशी आणि तालुक्याशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे.

जगबुडी नदीचे पाणी वेगाने गावात शिरल्याने येथील सुमारे ३०० ते ४०० ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाचा जोर अद्यापही कमी झालेला नसल्यामुळे नदीची पातळी आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत पाणी घराघरांमध्ये घुसल्यास या शेकडो ग्रामस्थांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागणार असून, सध्या त्यांच्यावर स्थलांतराची टांगती तलवार आहे.

गेल्या २० तासांपासून पुराच्या पाण्याने वेढलेल्या या भागात वीज आणि दळणवळणाची साधने ठप्प झाल्याने ग्रामस्थ प्रचंड भयभीत झाले आहेत. लहान मुले, महिला आणि वृद्धांना घेऊन सुरक्षित जागी कसे पोहोचावे, या चिंतेने गावकऱ्यांची झोप उडवली आहे. सर्वजण आता केवळ पाऊस थांबण्याची आणि पूर ओसरण्याची देवाकडे प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथक या संपूर्ण परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. बोटी आणि इतर बचाव साहित्यासह प्रशासन सज्ज झाले असून, परिस्थिती हाताबाहेर गेल्यास तात्काळ बचावकार्य सुरू केले जाईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत या ४०० ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे.