रत्नागिरी:- जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने युद्धपातळीवर दरड हटविल्यानंतर तब्बल १२ तासांनंतर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे कशेडी घाटातील खवटी परिसरात नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी मोठी दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.मोठ्या प्रमाणात माती व दगड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक बंद झाली होती. सध्या एकेरी वाहतूक सुरू असून उर्वरित माती व दगड हटविण्याचे काम अद्यापही सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटात रविवारी मध्यरात्री सुमारे २ ते २.३० वाजण्याच्या दरम्यान नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळली. खवटी मंडलिक कोंड ते हॉटेल अनुसया परिसरात डोंगरावरील मोठ्या प्रमाणात माती, दगड आणि झाडे महामार्गावर कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे बंद झाली. या दुर्घटनेत परिसरातील चार घरांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची माहिती मिळताच खवटी गावच्या सरपंच मानसी पाटील, पोलीस पाटील मिलिंद दळवी, मंडल अधिकारी उमाकांत देशमुख, तहसीलदार सुधीर सोनवणे, प्रांताधिकारी वैशाली पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि महावितरणचे कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जेसीबी, पोकलेन आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.
दरडीमुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल १२ तास ठप्प राहिल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हजारो प्रवासी महामार्गावर अडकून पडले होते. प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने दरडीलगतच्या घरांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. सतत पडणारा पाऊस आणि दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन मदतकार्य अत्यंत सावधगिरीने राबविण्यात आले.
दरम्यान, दुपारी १ वाजून ५५ मिनिटांनी मुंबईच्या दिशेने जाणारी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. त्यानंतर त्याच मार्गावरून गोव्याच्या दिशेनेही टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र दरड हटविण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरूच होते. प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आणि संबंधित यंत्रणांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
महामार्गावर अडकलेल्या प्रवाशांचा संताप
“रात्री तीन वाजल्यापासून आम्ही महामार्गावर अडकलो आहोत. मदतकार्य सुरू होण्यास खूप उशीर झाला. पिण्याचे पाणी, चहा आणि इतर सुविधा उपलब्ध नव्हत्या. काही ठिकाणी वस्तूंची जादा दराने विक्री होत होती. प्रशासनाने अशा परिस्थितीत प्रवाशांसाठी तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि महामार्ग लवकर सुरू करावा.”









