Wednesday, July 1, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी शहरातील अनधिकृत फलक, अतिक्रमण, दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश

रत्नागिरी शहरातील अनधिकृत फलक, अतिक्रमण, दोषी ठेकेदारांवर कडक कारवाईचे आदेश

रत्नागिरी पालिका सर्वसाधारण सभेत निर्णय

रत्नागिरी:- रत्नागिरी नगर परिषदेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी संपन्न झाली. या सभेत शहरातील रखडलेले प्रश्न, नागरिकांची सुरक्षा आणि विविध विकासकामांवरून नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. सभेतील मुख्य मुद्दे आणि घेतलेले निर्णय खालीलप्रमाणे आहेत:

शहरातील सर्व शाळा आणि कॉलेजेसच्या परिसरात असलेले मोठे जाहिरात फलक (होर्डिंग्स) विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. हा धोका लक्षात घेऊन हे सर्व फलक तात्काळ हटवण्याचा मोठा निर्णय सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांनी नगरसेवकांच्या मागणीवरून प्रशासनाला हे होर्डिंग्ज त्वरित हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या पावसामुळे फगरवठार येथील पालिकेच्या रस्त्याकडील संरक्षक भिंत कोसळल्याप्रकरणी सभेत जोरदार चर्चा झाली. संबंधित ठेकेदाराने भिंतीच्या खालच्या बाजूला असलेल्या खाजगी जागेत खोदकाम करण्यासाठी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. या दुर्घटनेला तोच जबाबदार असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तसेच ती पडलेली भिंत त्याच ठेकेदाराने स्वखर्चाने बांधून द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी लावून धरली.
राम नाका परिसरातील स्वस्तिक हॉस्पिटलच्या जागेत सुरू असलेल्या खाजगी बांधकामाचा गंभीर मुद्दा नगरसेवक केतन शेट्ये यांनी उपस्थित केला. विकासकाने पालिकेच्या मुख्य गटारीवर आणि रस्त्यावर ५ ते ६ फूट बाहेर येऊन पत्र्याचे फेन्सिंग मारले आहे. तसेच रस्त्यावर चिरे टाकून वाहतुकीस अडथळा निर्माण केला आहे. १८ मार्च २०२६ रोजी लेखी पत्र देऊनही प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई न केल्याबद्दल शेट्ये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि हा मार्ग तात्काळ मोकळा करण्याची मागणी केली.
शहरातील भाजी, फळ आणि चिकन विक्रेत्यांकडे पालिकेचे परवाने (लायसन्स) आहेत की नाही, याची तपासणी करण्यासाठी पालिकेमार्फत विशेष सर्व्हे केला जाईल. जे विक्रेते परिसरात स्वच्छता राखत नाहीत, त्यांना कडक नोटीस बजावण्यात येणार आहे. तसेच आरोग्य सभापतींच्या दालनात सर्व विक्रेत्यांची तातडीने बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना दिल्या जातील. बाजार फी वसुलीचा मक्ता देताना विक्रेत्यांकडून ८ महिन्यांची रक्कम पूर्ण भरून घ्यावी आणि त्यांच्यावरच परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सोपवावी, असे निर्देश देण्यात आले.
नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी उपस्थित केले की, पालिकेच्या स्ट्रीट लाईट पोलवर इंटरनेट, डिश टीव्ही आणि केबल कंपन्यांनी विनापरवानगी वायर्स टाकल्या आहेत. या कंपन्या पालिकेला कोणताही कर न देता व्यवसाय करत आहेत. यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे ठरले. तसेच खांबांवर लटकणारे अनधिकृत जाहिरात फलकही तात्काळ हटवण्याची मागणी नगरसेवक निमेश नायर यांनी केली, त्यानुसार प्रशासनाला आदेश देण्यात आले.
शहरातील मालको विहीर, तलाव व इतर दुर्लक्षित जलस्त्रोतांची योग्य साफसफाई करून तिथे सुरक्षेसाठी जाळ्या बसवण्याचा प्रस्ताव नगरसेविका वैभवी खेडेकर यांनी मांडला, ज्याला मंजुरी देण्यात आली. तसेच वेगवेगळ्या प्रभागांतील उघड्या विहिरींमध्ये उनाड गुरे कोसळण्याच्या घटना घडत असल्याने, प्रत्येक नगरसेवकाने आपापल्या प्रभागातील विहीर मालकांना सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे (भिंत) बांधण्याच्या सूचना द्याव्यात, असे ठरले.

आपल्या प्रभागात विकासकामे होत असताना स्थानिक नगरसेवकांना विश्वासात न घेता थेट कामांचे नारळ फोडले जात असल्याची तक्रार नगरसेविका वर्षा ढेकणे आणि अमित पिलणकर यांनी केली. तर नगरसेवक केतन शेट्ये व अमित पिलणकर यांनी आपल्या प्रभागातील कामांना प्रशासनाकडून बगल दिली जात असल्याचा आरोप केला. सर्व नगरसेवकांना समान न्याय देऊन प्रभागांमध्ये समान वागणूक मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.