रत्नागिरी:- मागील काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पौर्णिमेच्या मुहूर्तावर आपला जोर वाढवला आहे. रविवारी सायंकाळपासून जिल्हाभरात पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केले आहे. पुढील पाच जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून या कालावधीत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
रविवारी सायंकाळ पासून पावसाने पुन्हा आपला जोर वाढवला आहे. मागील चोवीस तासात जिल्ह्यात 108 च्या सरासरीने 975 मिमी पाऊस कोसळल्याची नोंद करण्यात आली आहे. मंडणगड तालुक्यात 130.50 मिमी, दापोली 130.57 मिमी, खेड 157.28 मिमी, चिपळूण 115.77 मिमी, गुहागर 93.00 मिमी, संगमेश्वर 102.66 मिमी, रत्नागिरी 77.77 मिमी, लांजा 91.20 आणि राजापूर तालुक्यात 76.25 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी सुरू झालेल्या पावसाचा जोर सोमवारी दुपार पर्यंत कायम होता. यामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांची पाणी पातळीत वाढ झाली होती.
चोवीस तास मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी नुकसान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यात मौजे फगरवठार येथील सरिता कृष्णा नलावडे यांच्या घरासमोरील संरक्षण भिंत कोसळली असून या दुर्घटनेत आहे कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय मौजे निवळी येथील मुंबई-गोवा महामार्गापासून रावणगवाडीकडे जाणारा रस्ता पावसामुळे खचलेला असून संबंधित ग्रामपंचायतला याबाबत कळविण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्याने भातशेतीच्या कामांनी पुन्हा जोर पकडला आहे.








