Monday, June 29, 2026
spot_img
Home संगमेश्वर संगमेश्वर बस स्थानकात वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संगमेश्वर बस स्थानकात वृद्धाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

संगमेश्वर:- प्रवासासाठी एसटी बसमध्ये बसलेल्या एका ७१ वर्षीय वृद्धाचा बस स्थानकातच दुर्दैवी अंत झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी संगमेश्वर बस स्थानकात घडली. जलाल हुसेन वणु (रा. मुस्लिम मोहल्ला, कळबस्ते) असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेमुळे कळबस्ते परिसरात मोठी शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जलाल वणु हे दुपारी संगमेश्वर येथून आपल्या गावी जाण्यासाठी एसटी बस स्थानकात आले होते. त्यांनी अणदेरी-कळबस्ते या बसमध्ये आपल्या नेहमीच्या जागेवर आसन ग्रहण केले. बस सुटण्याची प्रतीक्षा सुरू असतानाच, दुपारी १:४० च्या सुमारास त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागेवरच बेशुद्ध झाले. हा प्रकार पाहून बसमधील अन्य प्रवाशांनी त्वरित चालक व वाहकांना याबद्दल कल्पना दिली.

एसटीचे चालक संजय पांडुरंग जाधव, वाहक आणि स्थानकातील वाहतूक नियंत्रक यांनी तातडीने माणुसकी दाखवत त्यांना उपचारासाठी संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. हृदयविकाराच्या झटक्याने किंवा नैसर्गिक कारणाने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.