रत्नागिरी:- लोकशाही प्रक्रियेत मतदारांची नोंदणी अचूक आणि पारदर्शक असावी, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्यात ‘मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ राबवला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी मोहिमेची सुरुवात ३० जून २०२६ पासून होत असून, नागरिकांनी यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले आहे.
निवडणूक आयोगाने या कार्यक्रमासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत बीएलओद्वारे घरोघरी जाऊन भेटी देण्यात येणार आहेत. ५ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर या कालावधीत दावे व हरकतींवर निर्णय प्रक्रिया देण्यात येईल. ७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
मतदारांनी voters.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबीयांचे नाव तपासावे. ज्या मतदारांच्या तपशीलात तफावत आहे, त्यांना प्रशासनाकडून नोटीस पाठवली जाईल. अशा वेळी मतदारांनी जन्म दाखला, पासपोर्ट, शैक्षणिक प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र किंवा शासनमान्य ओळखपत्रांपैकी कोणताही एक वैध पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
काही अडचण असल्यास किंवा अधिक माहितीसाठी नागरिक कार्यालयीन वेळेत आपल्या संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकतात. यामध्ये दापोलीसाठी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, गुहागर वैशाली पाटील, चिपळूण आकाश लिगाडे, रत्नागिरी जीवन देसाई आणि
राजापूर साठी विश्वजीत गाताडे यांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









