संगमेश्वर:- प्रचंड घाईगडबडीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या नवीन सोनवी पुलावर महिना पूर्ण होण्याच्या आतच मंगळवारी सकाळी पहिला अपघात झाला. दोन ट्रक एकमेकांवर धडकल्याने महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी या पुलावरून एकच मार्गिका सुरू करण्यात आल्याने कुठलेही सुरक्षेचे उपाय न केल्याने हा अपघात झाल्याचे दिसून आले. या अपघातामध्ये झेवियर अल्वेरीस (वय ३१), शहीद पानाडी (२३) आणि सुरेश बांगर (३२) हे तिघे जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल सकाळी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना अचानक पुलाच्या दिशेने एक मोठा आणि भयानक आवाज झाला. त्यामुळे बसस्थानकातील प्रवासी, चालक-वाहक, स्थानिक ग्रामस्थांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. दोन ट्रक एकमेकांवर आदळले होते.
मुंबईच्या बाजूचा पूल पूर्ण न झाल्यामुळे याच मार्गिकेवरून मुंबई आणि गोवा अशा दोन्ही बाजूंनी येणारी-जाणारी वाहने सोडली जात आहेत. हा पूल तीव्र वळणाचा असल्याने समोरून येणाऱ्या वाहनांचा चालकांना अंदाज येत नाही. एकाच मार्गिकेतून परस्परविरोधी दिशांना जाणारी अवजड वाहने वळणावर समोरासमोर आल्यानेच हा अपघात घडला आहे.
या अपघातात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असली, तरी वाहनांचे चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्यांच्यावर आवश्यक ते प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांना सोडून दिले.
दोन्ही वाहने पुलाच्या मध्यभागीच अडकल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली आणि वाहतूक सुरळीत केली. संध्याकाळपर्यंत या अपघाताचा गुन्हा संगमेश्वर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता.









