फिटनेसप्रेमींसाठी नवे प्रेरणास्थान
रत्नागिरी:- आरोग्यदायी जीवनशैलीचा ध्यास घेतलेल्या फिटनेसप्रेमींसाठी खंडाळा येथे रविवार, २१ जून रोजी ‘बॉडी गॅरेज दि जिम ‘ या अत्याधुनिक व्यायामशाळेचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. जिमचे संचालक श्री. शक्तिराज धुंदूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या केंद्राचे उद्घाटन आयएफबीबी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य व प्रसिद्ध बिल्डर श्री. वीरेंद्र वणजू यांच्या शुभहस्ते फित कापून करण्यात आले.
बॉडी गॅरेज दि जिममध्ये व्यायामासाठी अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी लागणारे विशेष प्रशिक्षण अशा अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. हे फिटनेस सेंटर परिसरातील तरुणांसाठी एक हक्काचे आणि प्रेरणादायी ठिकाण ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
आरोग्य हीच खरी संपती: वीरेंद्र वणजू
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. वीरेंद्र वणजू म्हणाले की, “शरीरसौष्ठव क्षेत्रात गेली ३०-३५ वर्षे कार्यरत असताना मला जाणवले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आणि सुदृढ शरीर हीच माणसाची खरी संपत्ती आहे. युवकांनी नियमित व्यायाम, योग्य आहार आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचा अंगीकार करणे काळाची गरज आहे. केवळ सुदृढ राहण्यासाठीच नव्हे, तर व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैली जपण्यासाठी व्यायामाची कास धरा असे आवाहन वणजू यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्याला जिमचे मालक श्री. शक्तिराज धुंदूर व त्यांचे कुटुंबीय, सौ. योगिता वणजू, ज्येष्ठ उद्योजक श्री. प्रमोद घाटगे, कोच अखिलेश वायंगणकर, युवा उद्योजक कु. पार्थ पाटील, डॉ. जोग, संकेत पारकर, ऋषिराज धुंदूर, यश सुर्वे, पराग मोहिते, साईराज धुंदूर, साळवी, संकेत काताळे, परेश माने, राहुल पारकर, किरण जाधव, आशिष कांबळे, ओम घाटगे आणि सचिन भोपळे यांच्यासह अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाच्या शेवटी, निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाने व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवावे, असा संदेश देण्यात आला.









