Sunday, June 21, 2026
spot_img
Home रत्नागिरी फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

फणसवळे येथे सापडले गुरांचे अवयव; अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरालगत असलेल्या फणसवळे गावात गुरांचे अवयव आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हे अवयव प्लॅस्टिकच्या कापडात गुंडाळलेल्या अवस्थेत सापडले असून, ही धक्कादायक घटना समोर येताच स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, फणसवळे परिसरात जवळपास चार ते पाच गुरांचे अवयव बेवारस स्थितीत सापडले. या अवयवांची अवस्था पाहता, त्यांचे कातडे निर्दयीपणे काढण्यात आल्याचे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी हे अवयव ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाच्या गांभीर्याचा विचार करता पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, या गुन्ह्याचा तपास वेगाने सुरू आहे. याबद्दल अधिक माहिती देताना डीवायएसपी निलेश माईणकर यांनी सांगितले की, “घटनास्थळी सापडलेल्या गुरांचे कातडे काढलेले आहेत. हा प्रकार कोणी आणि का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत. लवकरच या प्रकरणातील गुन्हेगारांचा छडा लावला जाईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.