रत्नागिरी:- गणपतीपुळे-निवळी मार्गावर तरवळ गावी हॉटेल इंद्रधनुच्या मागे शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या मोटारसायकलला जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश मनोहर भोसले (वय ३१, रा. राई खापरेवाडी) हे आपली मोटारसायकल (एम.एच.०८ / एड्झेड / ९६११) घेऊन राईकडून मिरजोळेच्या दिशेने प्रवास करत होते. दरम्यान, गणपतीपुळे-निवळी मार्गावर तरवळ येथील हॉटेल इंद्रधनुच्या मागे पोहोचले असता, समोरून भरधाव वेगाने येणारी इरटीगा कार (एम.एच.२३/बी.एन./०९४४) आणि दुचाकीचा अपघात झाला.
आरोपी चालक ज्ञानेश्वर बाळासाहेब मुळ्ये (रा. नेकनूर, ता. जि. बीड) हा आपली कार अतिवेगाने चालवत होता. दुसऱ्या एका गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याने गाडीवरील ताबा सुटल्याने थेट फिर्यादीच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात निलेश भोसले यांना दुखापत झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी निलेश भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री ११ वाजता आरोपी चालक ज्ञानेश्वर मुळ्ये याच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.









