विना परवाना मासेमारी नौकांवर कारवाईची मोहीम 

रत्नागिरी:- मासेमारी परवाना नसताना आणि पर्ससिन मासेमारी करण्याचा परवाना नसताना त्या जाळयाने मासेमारी करणाऱ्या तीन नौकांवर कारवाई करण्यात आली. सहाय्यक मत्स्य  व्यावसाय आयुक्त कार्यालयातील परवाना अधिकारी सौ.रश्मी आंबूलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिरकरवाडा बंदरात सोमवारी संध्याकाळी ही कारवाई केली.

दोन दिवसांपुर्वी इम्तियाज जिवाजी यांच्या इम्तियाजी मासेमारी नौकेवर करवाई करण्यात आली होती. या नौकेचे कागदपत्र घेवून सोमवारी सकाळी मत्स्य व्यावसाय आयुक्त कार्यालयात बोलविण्यात आले होते. परुंतू नौका मालक कार्यालयात न आल्याने परवाना अधिकारी रश्मी आंबूलकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिरकरवाडा बंदर गाठले. कारवाई केलेली इम्तियाजी नौका बंदरात आल्यानंतर त्या नौकेतील महिलांना व खलाश्यांना नौकेतून खाली उतरण्यास सांगण्यात आले. त्यावेळी त्या महिलांनी परवाना अधिकार्यासह पथकाला अपशब्द वापरले. त्यामुळे परवाना अधिकार्यांनी पोलीस बंदोबस्त बोलावून घेतला. त्यानंतर हि नौका मच्छि उतरविण्यासाठी दुसर्‍या जेटीवर पटवून नेण्यात आली. रात्री उशीरापर्यंत या इम्तियाजी नौकेचा पोलीस बंदोबस्तात शोध सुरु होता.

एकिकडे इम्तियाजी नौकेची शोधाशोधसाठी पथकाची धवपळ सुरु असतानाच इतर दोन नौका बंदरात दाखल झाल्या. त्यातील एका नौकेचा मासेमारी परवाना नव्हता तर दुसर्या नौकेकडे पर्ससिन नेटने मासेमारी करण्याचा परवाना नव्हता. या दोन्ही नौका बंदरावर अटकावून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच नौकांमधील मासळी जप्त करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरु होती.