Sunday, June 7, 2026
spot_img
Home रत्नागिरी रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे एसटी बस- रुग्णवाहिकेची धडक

रत्नागिरी आरोग्य मंदिर येथे एसटी बस- रुग्णवाहिकेची धडक

परिसरात दोन तास वाहतूक कोंडी

रत्नागिरी:- शहरातील आरोग्य मंदिर परिसरात शनिवारी संध्याकाळी एसटी बस आणि रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला. रुग्णवाहिका रिकामी असल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँडवरून गणपतीपुळेच्या दिशेने जाणारी एसटी बस आरोग्य मंदिर परिसरातून जात होती. त्याच वेळी रुग्ण घेण्यासाठी उद्यम नगर येथील रुग्णालयाकडे निघालेल्या रुग्णवाहिकेची या एसटी बससोबत जोरदार धडक झाली.

रुग्णवाहिका रुग्णाला आणण्यासाठी जात असल्याने ती रिकामी होती. जर रुग्णवाहिकेत रुग्ण असता, तर गंभीर परिस्थिती उद्भवली असती. सुदैवाने, या अपघातात कोणीही जखमी झाले नाही, मात्र अपघाताची तीव्रता इतकी होती की, एसटी बसची दर्शनी काच फुटली, तर रुग्णवाहिकेचा टायरही फुटला.

अपघातानंतर आरोग्य मंदिर परिसरात काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती.