सुविधांचा बोजवारा, व्यवस्था न सुधारल्यास ठाकरे गटाचा तीव्र आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील आणि संपूर्ण जिल्ह्यातील गरीब तसेच गरजू रुग्णांसाठी हक्काचे आणि आशेचे केंद्र असलेल्या शासकीय रुग्णालयाची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. रुग्णालयातील ढिसाळ आणि ढिसाळ कारभारामुळे सामान्य जनतेला नाहक मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत असून, रुग्णांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. या गंभीर परिस्थितीविरोधात आता शिवसेना ( ठाकरे गट ) आक्रमक झाली असून, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णालय प्रशासनाला तीव्र इशारा देणारे निवेदन सादर करण्यात आले आहे. येत्या ८ दिवसांत रुग्णालयातील सर्व व्यवस्था न सुधारल्यास प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
रुग्णालयातील दुरवस्थेचा पाढा वाचताना शिवसैनिकांनी प्रशासकीय अनास्थेवर तीव्र संताप व्यक्त केला. सध्या रुग्णालयात सर्वात महत्त्वाची अशी एक्स-रे फिल्मच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे गरीब रुग्णांना नाईलाजास्तव बाहेरील खाजगी केंद्रांमधून महागडे एक्स-रे काढून घ्यावे लागत आहेत, ज्यामुळे त्यांच्या खिशाला मोठा भुर्दंड बसत आहे. याशिवाय रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, येथील टॉयलेट्स पूर्णपणे तुंबलेली आहेत. तिथून येणाऱ्या प्रचंड दुर्गंधीमुळे वॉर्डमधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रुग्णालयातील आपत्कालीन आणि अपघात विभागाची स्थिती तर अतिशय वाईट असून, गंभीर रुग्णांवर वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
रुग्ण सेवेचा दर्जा घसरण्यामागे कर्मचाऱ्यांची कमतरता हेही एक मुख्य कारण असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रुग्णालयात कायमस्वरूपी वॉर्ड बॉयऐवजी कंत्राटी पद्धतीवरील वॉर्ड बॉय काम करत असल्याने रुग्णांची काळजी योग्य प्रकारे घेतली जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. एवढेच नव्हे तर रुग्णालयाच्या बाहेरील परिसरात वाहने उभी करण्यासाठी कोणतीही शिस्तबद्ध व्यवस्था नसल्याने तिथे वाहनांची प्रचंड कोंडी होते. याचा फटका थेट आपत्कालीन रुग्णवाहिकांना बसत असून, रुग्णांना घेऊन येणाऱ्या वाहनांना येण्या-जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे.
यावेळी उपशहरप्रमुख नितीन तळेकर, सलील डाफळे, नगरसेवक केतन शेटे, अमित विलणकर, विभागप्रमुख राजाराम रहाटे, संदेश भिसे, रोहित मयेकर, तन्वीर मुजावर, दिलावर गोदड, सुफियान जयगडकर, प्रसन्न सुर्वे, रोहन वरेकर, मंदार वरेकर, अमन राणे, गौरव कळंबटे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकहितार्थ रुग्णालयाचा कारभार तात्काळ सुधारावा, अन्यथा शिवसेनेच्या तीव्र आंदोलनाला सामोरे जावे, असा थेट इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.









