पाणी कपातीची गरज नाही: निमेश नायर
रत्नागिरी:– रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरण क्षेत्रात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून, शहरवासीयांना २० जूनपर्यंत पाणी कपातीची झळ सोसावी लागणार नसल्याची माहिती नगर परिषदेचे पाणी सभापती निमेश नायर यांनी दिली आहे. वाढत्या तापमानामुळे पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात असतानाच, नायर यांनी प्रत्यक्ष धरण क्षेत्राची पाहणी करून उपलब्ध साठ्याची आकडेवारी जाहीर केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पाणी सभापतींनी केलेल्या पाहणीनुसार, शीळ धरणाची सध्याची पाणी पातळी ११२.५५ मीटर इतकी आहे. धरणामध्ये सध्या एकूण ०.९०३ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ९०३ एमएलडी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. पावसाळा सुरू होण्यास अद्याप काही कालावधी शिल्लक असला, तरी धरणातील या साठ्यामुळे शहराची पाण्याची चिंता सध्या मिटली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
धरणातील पाणी वापरायचे गणित मांडताना त्यांनी सांगितले की, दररोज होणारे पाण्याचे बाष्पीभवन २५ एमएलडी गृहीत धरून जरी पाण्याचा वापर केला, तरी उपलब्ध साठा पुढील ३५ दिवस सहज पुरू शकतो. त्यामुळे येत्या २० जूनपर्यंत रत्नागिरी शहरात कोणत्याही प्रकारची पाणी कपात करण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रशासकीय पातळीवर पाण्याचे नियोजन चोख ठेवण्यात आले असून नागरिकांनी घाबरून न जाता पाण्याचा वापर जपून करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
गतवर्षीच्या तुलनेत आणि वाढत्या उन्हाचा विचार करता, पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळेच २० जूनपर्यंतचा टप्पा गाठणे शक्य होणार आहे. नगर परिषद पाणी पुरवठा विभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, सध्या तरी शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट नसल्याचे नायर यांच्या पाहणीनंतर स्पष्ट झाले आहे.









